... त्यामुळे दाढी वाढलेल्या प्रभू श्रीरामांच्या चित्रावरुन 'सोशल मीडिया पे चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 03:10 PM2018-07-30T15:10:24+5:302018-07-30T15:17:55+5:30
कर्नाटकमध्ये अंजनीपुत्र हनुमानाचे पेंटींग चित्र काढल्यानंतर चर्चेत आलेले कलाकार करण आचार्य यांनी आता प्रभू श्रीराम यांचे चित्र रेखाटले आहे. करण आचार्य यांनी या पेंटींगमध्ये श्रीराम यांच्या चेहऱ्यावर दाढी काढली आहे.
मंगळुरू - कर्नाटकमध्ये अंजनीपुत्र हनुमानाचे पेंटींग चित्र काढल्यानंतर चर्चेत आलेले कलाकार करण आचार्य यांनी आता प्रभू श्रीराम यांचे चित्र रेखाटले आहे. करण आचार्य यांनी या पेंटींगमध्ये श्रीराम यांच्या चेहऱ्यावर दाढी काढली आहे. त्यानुसार, वनवासानंतर प्रभू राम यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा दाखविण्याचा प्रयत्न आचार्य यांनी केला आहे. या चित्राला लवकरच टी-शर्ट आणि इतर ठिकाणी प्रिंट करण्यात येणार असल्याचेही आचार्य यांनी म्हटले.
करण आचार्य यांनी यापूर्वी अंजनीपुत्र हनुमान यांचे रागीट भावमुद्रा असलेले एक पेंटींग केले होते. त्यानंतर, सोशल मीडिया आणि कर्नाटकमधील अनेक गाडींवर हे चित्र लावून लोकांनी चित्राचे कौतूक केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कर्नाटकमधील एका रॅलीमध्ये हनुमानाच्या या चित्राचे कौतूक केले होते. त्यामुळे कलाकार करण आचार्य यांनीही ते चित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. आचार्य यांना श्रीराम यांचे पेंटींगचित्र काढण्यासाठी तब्बल एक महिना कालावधी लागला आहे. आता, लवकरच टी-शर्ट आणि इतर प्रिंटींगच्या माध्यमातून हे चित्र सर्वसामान्य लोकांमध्ये आणण्याची तयारी सुरू असून विशेषत: राम नवमीच्या महिन्यानिमित्त हे चित्र रेखाटून सोशल मीडियावर शेअर केल्याचे आचार्य यांनी म्हटले. तर रावणाचा वध करण्यापूर्वी प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा या चित्रातून दर्शवण्यात आल्याचेही आचार्य यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अंजनीपुत्र हनुमानाच्या चित्रामुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र, मला कॉपीराईटबाबत काहीही माहिती नव्हती. त्यामुळे, मी यावेळी या चित्राचे कॉपीराईट मिळवण्यासाठी अर्ज केला असल्याचेही आचार्य यांनी म्हटले आहे.