Join us

... म्हणून देशभरात जातनिहाय जनगणना करा, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 8:52 AM

आता जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. 

मुंबई - बिहार सरकारने जातनिहाय जनगणना करत देशातील जातीव्यवस्थेचं चित्रच सर्वांसमोर मांडलं आहे. नीतीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणनेचा अहवाल जारी केला. बिहारमध्ये ओबीसींच्या जातनिहाय गणनेचा अहवाल सादर होताच राज्यात भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत महाराष्ट्रात ही ओबीसींची जातनिहाय गणना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर सविस्तर चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले आहे. मात्र, आता जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. 

देशात शेवटची जातनिहाय जनगणना प्रकाशित झाली १९३१ साली, म्हणजे ९० वर्षांपूर्वी. १९४१ मध्ये जातनिहाय आकडेवारी घेतली गेली, पण ती लोकांसमोर आली नाही. स्वतंत्र भारतात एकदाही जातनिहाय जनगणना झालेली नाही यावरून सगळ्याच पक्षांनी सत्तेत असताना हा विषय टाळला हे स्पष्टच दिसतं. मात्र, आता बिहार सरकारने जातनिहाय जनगणना केली असून त्याचा अहवाल सादर केल्याने पुन्हा एकदा जातनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. महाराष्ट्रातही भाजपमधील काही नेत्यांसह काही राजकीय पक्षांनीही जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसनेही ही आपली आग्रही मागणी असल्याचं म्हटलं आहे. 

संविधान निर्मात्यांनी या देशात आरक्षण देण्यासाठी निकष म्हणून जात हे एकक वापरले आहे. याचे कारण आपल्या देशाची रचना हजारो वर्ष जातींच्या उतरंडीवर उभी आहे. म्हणूनच आजच्या घडीला देशात विकासाची धोरणे आखताना कोणत्या जातीची नक्की संख्या किती आहे, हे निर्धारित होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण देशभरात जातिनिहाय जनगणनेची आग्रही मागणी करत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करुन ही मागणी केली.

ओबीसी जनगणना करावी- बावनकुळे

राज्यातील ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशी मागणी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे करणार असल्याची मोठी घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत त्यांनी ही घोषणा केली. 

बिहार सरकार केली जनगणना

बिहार सरकारने नुकतीच जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. यात हिंदूमुस्लीम, शीख ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध यांच्यासह राज्यातील सर्व धर्म आणि जातींच्या लोकसंख्येची आकडेवारी देण्यात आली आहे. यापूर्वी 2011 मध्ये जनगणना झाली होती. तेव्हाच्या जनगणनेची आकडेवारी आणि ताज्या जातीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार, हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्येत काही प्रमाणावर बदल झाला आहे. बिहारमध्ये 2011 ते 2023 दरम्यान येथील हिंदु लोकसंख्या 0.8 टक्क्यांनी कमी झाली, तर तर मुस्लीम लोकसंख्या 0.8 टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय, अहवालात ख्रिश्चन, शिख, बौद्ध आणि जैन समाजाची आकडेवारीही देण्यात आली आहे. यानुसार, ख्रिश्चन, शिख आणि जैन समुदायाची लोकसंख्याही घटली आहे.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटीलमुंबईबिहार