लोकमत न्यूज नेटवर्क उरण : उरणच्या सभेसाठी अटल सेतूवरून आलात आणि शिव्या घालून गेलात. शिव्या घालायच्या असतील तर आम्ही बांधलेले रस्ते, अटल सेतूवरून येऊ नका. समुद्रमार्गे बोटीतून या, अशी बोचरी टीका उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे नेते व उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मेळाव्यातून केली.
मावळ लोकसभेच्या उरण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी जेएनपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. उरण येथील ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर केलेल्या टीकेचा धागा पकडून उदय सामंत यांनी भाजप आघाडीच्या केंद्र व राज्य सरकारने उभारलेले रस्ते अटल सेतूवरून येऊन शिव्या घालायच्या असतील आम्ही बांधलेले रस्ते, अटल सेतूवरून येऊ नका, समुद्रमार्गे बोटीतून या, अशी टीका केली.
शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही!रायगडमधील शेतकऱ्यांवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत खासदार दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, भाजप आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे, अतुल पाटील यांचीही भाषणे झाली.