मुंबई - मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राजु साप्ते यांनी आज आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. तत्पूर्वी एक सुसाईड व्हिडिओही त्यांनी बनवला आहे. त्यानंतर, मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, यापुढे कलाकारांना त्रास दिल्यास हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच आहे, असा इशाराच खोपकर यांनी दिला आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येपासून चित्रपट क्षेत्राशी संबंधित कलाकारांच्या आत्महत्या चर्चेचा विषय बनत आहे. आता, आणखी एका कलाकाराने व्हिडिओ पोस्ट करुन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला, त्यामध्ये आत्महत्येचं कारण सांगितल आहे. लेबर युनियमधील राकेश मौर्य यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचे साप्ते यांनी म्हटलं आहे. साप्तेंच्या निधनाच्या वृत्तानंतर मनसेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनचिसेचे अमय खोपकर यांनी युनियनच्या नेत्यांना इशाराच दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर मनसेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन खोपकर यांनी केले आहे. तसेच, भविष्यात कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच समजा, असा थेट इशाराच खोपकर यांनी फेसबुक अकाऊंटवरुन दिलाय.
मृत्यूपूर्वी व्हिडिओतून काय म्हणाले राजू साप्ते
'आपण हा व्हिडीओ कोणत्याही नशेमध्ये बनवत नसून मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत. माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. पण, राकेश मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरु करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचं साप्ते यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच, मला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी याच व्हिडिओतून केली आहे.
दरम्यान, या घटनेने मराठी सिनेवर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाकडे आता पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.