मुंबई - भोसरी येथील भूखंड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून शनिवारी आपल्याला नोटीस प्राप्त झाली आहे. ३० डिसेंबरला मुंबईतील ईडी कार्यालयात बोलाविण्यात आले असून चौकशीत आपण सर्व सहकार्य करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी माध्यमांना दिली होती. मात्र, कोरोनाची लक्षणं दिसत असल्यानं आपण सध्या ईडी कार्यलयात चौकशीला हजर राहू शकत नसल्याचं खडसेंनी सांगितलंय. खडसेंनी एक पत्र लिहून यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.
भोसरी येथील भूखंड हा पत्नी मंदाकिनी यांनी खरेदी केला असून एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित माझ्या नावाने ही नोटीस आली असेल. या प्रकरणात ही पाचवी चौकशी असल्याचे खडसेंनी सांगितले होते. दरम्यान, ईडी कार्यालयात आज उपस्थित होणार होतो, पण कोरोनासदृश्य लक्षणं असल्यामुळे मी 14 दिवसांनंतर ईडी कार्यालयात हजर होईल, असे ईडी कार्यालयास कळवले होते. संबंधित कार्यालयानेही यास संमती दिली आहे. त्यामुळे, 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर मी ईडी कार्यालयात जाऊन चौकशीसाठी सहकार्य करेन, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी एका पत्राद्वारे प्रसिद्ध केले आहे.
वर्षा राऊत यांनाही नोटीस
भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याच्या वृत्ताने शुक्रवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर, दोन दिवसांतच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस देण्यात आली आहे. या घटनांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.