... तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात दिसेल, आता रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 10:36 AM2022-12-07T10:36:18+5:302022-12-07T10:36:53+5:30
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील सर्वच विरोधी पक्ष राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत.
मुंबई - कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक प्रशासनाने ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली. महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी ४८ तासांचा अल्टीमेटच दिला आहे. त्यानंतर, आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन या हल्ल्यामागे दिल्लीचा हात असण्याची शंका उपस्थित केली आहे. तर, आमदार रोहित पवार यांनी शरद पवार जे बोलतात ते करुन दाखवतात, असे म्हटले आहे.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील सर्वच विरोधी पक्ष राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. जेव्हा राज्यकर्ते असता, तुम्ही सत्तेत असता. केंद्रात तुमची सत्ता आहे, कर्नाटकात तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात तुमचीच सत्ता आहे. अशावेळी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जर यापद्धतीचं राजकारण होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. शरद पवार जेव्हा बोललेत, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून ते बोललेत, यापूर्वी त्यांनी ते करुन दाखवलेलं आहे. पवारसाहेब बोलतात तेव्हा ते बोलण्यासाठी नाही तर करण्यासाठी असतं. महाराष्ट्राच्या सरकारने योग्य भूमिका घेतली नाही, तर पवारसाहेब जे बोललेत ते करतील. शरद पवार जेव्हा ते करतील तेव्हा अख्खा महाराष्ट्रात कर्नाटकात दिसेल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने आपल्या राज्याची अस्मिता टिकवण्यासाठी योग्य ती भूमिका घेण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने योग्य ती भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, असेही पवार यांनी म्हटले.
काय म्हणाले शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. संविधानाने सर्वांना अधिकार दिलेत आहेत, ज्यांनी हे संविधान दिले त्यांच्या महापरिनिर्वाण दिवशी आज काही तोडफोडीची घटना घडली आहे. कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये येतं आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी आता भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपलं नाही, तर मला बेळगावात जावं लागेल. तेथिल स्थानिकांना धीर द्यावा लागेल, असंही शरद पवार म्हणाले.