त्रिकुटाला वांद्रे पोलिसांकडून अटक : ५०० रुपयांच्या ७६ नोटा हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे वर्षभरापूर्वी नोकरी, व्यवसाय गमावणाऱ्या तिघांनी उदरनिर्वाहासाठी बनावट नोटा छपण्याचा उद्योग सुरू केला. यु ट्यूबवर पाहून त्यांना ही युक्ती सुचली. मात्र, मुंबई पोलिसांनी मंगळवारी त्यांचा गाशा गुंडाळल्याने हा प्रकार उघडकीस आला.
आफताब शेख, इम्रान शेख आणि नदीम फसोपकर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
आफताब हा अभियंता आहे, तर नदीम हा कळव्यात हॉटेल व्यावसायिक असून, इम्रान खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. मात्र, लॉकडाऊन दरम्यान त्यांचे उपजीविचे सर्व मार्ग बंद झाले आणि या तिन्ही मित्रांनी मिळून बनावट नोटा छापत त्या चलनात आणण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी युट्यूबची मदत घेतली. या नोटा त्यांनी शास्त्रीनगरच्या बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी वांद्रे पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोहर धनावडे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तिघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली. ज्यात त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या ७६ नोटा सापडल्या. यु ट्यूबवर पाहून इम्रानने जोगेश्वरीत त्याच्या परिचयातील प्रिंटर मशीन चालकाकडून नोटा छापून घेतल्या, तर नदीम याने झोपडपट्टीमध्ये या नोटा चलनात आणल्या. याप्रकरणी वांद्रे पोलीस अधिक चौकशी करत आहेत.