आतापर्यंत १३८९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:05+5:302021-09-05T04:11:05+5:30
मुंबई : पुढच्या आठवड्यात गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने सार्वजनिक मंडळांची धावपळ सुरू आहे. यंदाही कोरोनाचे सावट असले तरी आतापर्यंत ...
मुंबई : पुढच्या आठवड्यात गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने सार्वजनिक मंडळांची धावपळ सुरू आहे. यंदाही कोरोनाचे सावट असले तरी आतापर्यंत २२१८ मंडळांनी महापालिकेकडे अर्ज केला आहे. यापैकी १३८९ म्हणजेच ६३ टक्के मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंडळांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशी तीन हजार मंडळे दरवर्षी मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेत असतात. त्यानुसार महापालिकेने गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी १४ जुलैपासून अर्ज मागवण्यास सुरुवात केली.
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले होते. १७०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, यावर्षीही कोरोनाचे सावट कायम असले तरी बहुतांशी मुंबईकरांचे लसीकरण झालेले आहे. गणेशोत्सव मंडळांची संख्या या वेळेस जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
* यावर्षीही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळांना परवानगी मिळाली तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे त्यांना पालन करावे लागणार आहे.
* आतापर्यंत पालिकेकडे आलेल्या २२१८ मंडळांच्या अर्जांपैकी २२८ अर्ज फेटाळण्यात आले आहेत, तर ६०१ अर्जांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. १३८९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.