Join us

मुंबईत म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत १९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून म्युकरमायकोसिसचे १९ बळी गेले आहेत. हे रुग्ण कोविडमुक्त झाले होते, मात्र त्यानंतर म्युकरमायकोसिसमुळे गुंतागुंत ...

मुंबई : मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून म्युकरमायकोसिसचे १९ बळी गेले आहेत. हे रुग्ण कोविडमुक्त झाले होते, मात्र त्यानंतर म्युकरमायकोसिसमुळे गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यू ओढवल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. उशिरा निदान आणि औषधांच्या तुटवड्यामुळे मृत्यू ओढावत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी मांडले आहे.

फेब्रुवारी ते मे या कालावधीत जे. जे रुग्णालयात तीन रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे बळी गेला आहे, तर सध्या ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच केईएममध्ये आणखी एका रुग्णाचा बळी गेला आहे. नायर रुग्णालयात सध्या ११ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू असून ८० टक्के रुग्ण हे मुंबईबाहेरील असल्याचे दिसून आले आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, नाकात काळ्या बुरशीचा संसर्ग, डोळे लाल झाल्यावर हे रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. तोवर संसर्ग पसरलेला असतो. त्यामुळे बाधित भाग काढून टाकावा लागतो. त्यानंतर मेंदूपर्यंत हा संसर्ग पोहोचल्यास मृत्यूचा धोका असतो.

सायन रुग्णालयाच्या कान, नाक, घसा विभागाच्या प्रमुख डॉ. रेणुका ब्राडो यांनी सांगितले की, या संसर्गात ५० टक्के मृत्यूचा धोका असतो. दुसऱ्या लाटेत ४५ हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यातील १५ रुग्णांवर मृत्यू ओढवला आहे.

केईएम रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अचानक म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्यामुळे औषधांचा तुटवडा जाणवत आहे, परिणामी त्यावर काम सुरू असून लवकरच यावर मार्ग काढण्यात येईल.

अँटिफंगल औषध ऑक्सिजनइतकेच महत्त्वाचे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी म्युकरमायकोसिसचे वर्षाला १० रुग्ण आढळून येत होते, परंतु कोरोनानंतर आता दिवसाला ३-४ रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे यावर उपचाराकरिता लागणारी अँटिफंगल औषधे ऑक्सिजनइतकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या डॉ. ब्राडो यांनी दिली आहे.

उत्पादनात करणार वाढ

द रिटेल अँड डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशनने या औषधांच्या उत्पादकांना तुटवड्यावर उपाय म्हणून उत्पादनात वाढ करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे, याविषयीचे अँटिफंगल इंजेक्शन थेट रुग्णांच्या नातेवाईक वा कुटुंबीयांना न मिळता जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद दानवे यांनी दिली आहे.