राज्यभरात आतापर्यंत २,३७८ पक्ष्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 05:17 AM2021-01-16T05:17:55+5:302021-01-16T05:18:25+5:30
८ जानेवारीपासूनची आकडेवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव सुरू असून, ८ जानेवारीपासून आजतागायत एकूण २ हजार ३७८ पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात १४ जानेवारी रोजी लातूर येथे ४७, गोंदिया २५, चंद्रपूर ८६, नागपूर ११०, यवतमाळ १०, सातारा ५०, रायगड जिल्ह्यात ३ अशी ३३१ मृत पक्ष्यांची नोंद झाली.
सांगली जिल्ह्यात ३४, अमरावती व सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी १ बगळा, पोपट, चिमण्या व वर्धा येथे ८ मोर अशा एकूण ४४ पक्ष्यांची आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. नाशिक जिल्ह्यात, यवतमाळ, नंदुरबार ६, पुणे २ व जळगाव जिल्ह्यात २ कावळ्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे एकूण ३८२ पक्षी मृत झाले.
मुंबई, घोडबंदर, दापोली व बीड येथे सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. ६६ नमुन्यांपैकी २२ अहवाल प्रलंबित असून ४४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कुक्कुटमध्ये ८ नमुने होकारार्थी आले असून त्यात परभणी, लातूर, बीड व नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच १३ नमुने नकारार्थी आले असून त्यात परभणी, लातूर, बीड, अकोला, अमरावती, अहमदनगर, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
कावळ्यांचे एकूण ९ नमुने होकारार्थी आले असून त्यात मुंबई, बीड, ठाणे, रत्नागिरी, नाशिक व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. चंद्रपूर येथील एक नमुना नकारार्थी आढळून आला आहे. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्यमध्ये १० नमुने होकारार्थी आढळून आले असून त्यात परभणी, लातूर, ठाणे, नाशिक, व अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच गोंदिया, नागपूर, नाशिक, यवतमाळ व सातारा येथील नमुने नकारार्थी आढळून आले आहेत.
‘टाेल फ्री’वर संपर्क साधण्याचे आवाहन
नागरिकांनी मृत पक्ष्यांना हात लावू नये, त्यांचे शवविच्छेदन करू नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पक्षी मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.