लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशला आजपर्यंत जवळपास ४,२०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला असून, महाराष्ट्राला एकूण २९३ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.
महाराष्ट्रातील काेरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्यानंतर ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन टॅंकर आणण्यात आले. आता ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून विविध राज्यांत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.
महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेशमध्ये १,२३० मेट्रिक टन, मध्य प्रदेशमध्ये २७१ मेट्रिक टन, हरयाणा ५५५, तेलंगणा १२३, राजस्थान ४०, तर दिल्लीत १,६७९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.
सर्व अडथळ्यांवर मात करून आणि नवीन उपाय शोधून भारतीय रेल्वे ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन’ म्हणजेच द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू देशभरातील विविध राज्यांत पोहोचवत आहे. आतापर्यंत, भारतीय रेल्वेने सुमारे ४२०० मेट्रिक टन ऑक्सिजन २६८ अधिक टँकरद्वारे देशभरात वाहून नेऊन वितरित केला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या मार्गांवर ६८ ऑक्सिजन एक्स्प्रेसने नियाेजित प्रवास पूर्ण केला आहे.
..........................................................