कोविड लस घेतल्यानंतर राज्यात आतापर्यंत ३५ जणांचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 09:32 AM2021-09-05T09:32:12+5:302021-09-05T09:32:59+5:30
मृतांमध्ये ५० वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २८ जणांनी कोविशिल्ड, तर ७ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जानेवारी ते एप्रिल २०२१ दरम्यान कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या राज्यांतील ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यात मुंबईकरांची संख्या निम्म्याहून अधिक आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर राज्यभरात किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती आरोग्यतज्ज्ञ डॉ. दिनेश सोळुंके यांनी माहिती अधिकार अधिनियमान्वये शासनाकडे मागितली होती. त्यांच्या अर्जाला उत्तर देताना राज्य कुटुंब कार्यालयातर्फे उपरोक्त माहिती देण्यात आली. मृत्यू झालेल्यांपैकी ३० जणांनी पहिला, तर ५ जणांनी दुसरा डोस घेतला होता.
मृतांमध्ये ५० वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २८ जणांनी कोविशिल्ड, तर ७ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांत मुंबईकरांची संख्या सर्वाधिक १८ इतकी आहे. त्यात १४ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. या रुग्णांना अन्य कोणते गंभीर स्वरूपाचे आजार होते का, याबाबत स्पष्टता यात दिलेली नाही. दरम्यान, यासंदर्भात राज्य कुटुंब कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जानेवारी ते एप्रिल २०२१ दरम्यान लस घेतलेल्या ४ हजार २८९ जणांना त्रास झाला. त्यापैकी ४ हजार १९७ लसवंतांना किरकोळ, ४९ जणांना गंभीर, तर ४३ नागरिकांना अतिगंभीर त्रासाला सामोरे जावे लागल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?
मुंबई – १८, ठाणे – ४, नागपूर – ३, पुणे – २, लातूर – २, सातारा – १, रत्नागिरी – १, औरंगाबाद – १, बीड – १, कोल्हापूर – १, नाशिक - १
९ मार्च २०२१ रोजी मी अर्ज केला होता, त्याचे उत्तर २ सप्टेंबरला मिळाले. कोरोनाबळींच्या आकडेवारीप्रमाणे लस घेतल्यामुळे मृत्यू झालेल्यांचा तपशीलही जाहीर करायला हवा. शेवटी हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे. ही माहिती सुरुवातीच्या तीन महिन्यांचीच आहे. मे महिन्यात लसीकरणाने खऱ्या अर्थाने जोर घेतला. या काळातील मृत्यूंचा शोध घेणे गरजेचे आहे.
- डॉ. दिनेश सोळुंके, आरोग्यतज्ज्ञ