Join us

आतापर्यंत ४७ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:09 AM

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका वर्तविण्यात आला आहे; मात्र पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही नवजात शिशू ...

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका वर्तविण्यात आला आहे; मात्र पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही नवजात शिशू ते १९ वर्षांपर्यंतच्या ४७ हजार ५८८ मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. तर ६१ मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. आतापर्यंत सात लाख ४१ हजार ३९१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी सात लाख २० हजार १९९ कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या २८०१ रुग्ण सक्रिय आहेत. तर १५९५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येण्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यानुसार लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड केंद्र, डॉक्टर - परिचारिका, औषध, ऑक्सिजन आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र मार्च २०२० ते आतापर्यंत नवजात शिशू ते नऊ वर्षे वयोगटापर्यंत १३ हजार ३६३ लहान मुलांना कोविडची लागण झाली होती. यामध्ये ४५ टक्के मुली तर ५५ टक्के मुलं होती. यापैकी २० मुलांचा मृत्यू झाला होता. तर १० ते १९ वर्षे वयोगटातील ३४ हजार २२५ मुलांना लागण झाली होती. यात ५६ टक्के मुली तर ४४ टक्के मुलगे होते. यापैकी ४१ मुलांचा मृत्यू झाला आहे.