मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेसाठी एकूण ५५ किमी लांबीचे भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ७६ टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले असून, हे काम सतरा टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम) साहाय्याने करण्यात येत आहे. डिसेंबर, २०२० पर्यंत हे भुयारीकरण पूर्ण करण्याचे मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसीएल) लक्ष्य आहे.
मेट्रो-३ प्रकल्पामध्ये भुयारीकरणासह इतर कामांनाही वेग आला आहे. या संपूर्ण मार्गिकेवरील स्थानकांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, या मार्गिकेवरील २६ मेट्रो स्थानकांपैकी सहा स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका आणि एमआयडीसी अशा सहा मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे, तर २६ मेट्रो स्थानकांपैकी १३ स्थानकांचे भुयारीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित १३ मेट्रो स्थानकांचे भुयारीकरण येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. सहा मेट्रो स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण झाल्याने इतर कामांनाही आता गती येणार आहे. मेट्रो मार्गिकेसाठी ५५ किमीचे भुयारीकरण करण्यात येणार आहे. मेट्रो-३ मार्गिकेने सहा व्यावसायिक केंद्रे, पाच उपनगरीय रेल्वे स्थानके, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ व लोकलने न जोडलेले परिसर जोडले जाणार आहेत.३२ पैकी २५ ब्रेकथ्रू पूर्णमेट्रो-३ मार्गिकेचे काम एकूण सतरा टीबीएमच्या साहाय्याने करण्यात येत असून, आत्तापर्यंत ३२ ब्रेकथ्रूपैकी २५ ब्रेकथ्रू पूर्ण करण्यात आले आहेत. आता फक्त सात ब्रेक थ्रू शिल्लक आहेत. या उर्वरित ब्रेकथ्रूचे कामही आता वेगाने करण्यात येत आहे. मेट्रो स्थानकांच्या स्लॅबच्या कामासह मेट्रो-३ मार्गिकेचे संचलन आणि देखभाल कामाच्या निविदा लवकरच मागविण्यात येतील, तर जायकाच्या कर्जाचा तिसरा टप्पा मार्चपर्यंत येणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, या वर्षी मार्गासाठी रूळ टाकण्याचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. यासह विविध प्रणालींच्या कामात आरेखन काम पूर्ण होऊन उपकंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.