कोरोनाबाबत राज्यात आतापर्यंत ९१ हजार गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 04:20 PM2020-05-03T16:20:43+5:302020-05-03T16:21:06+5:30
लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९१,२१७ गुन्हे दाखल झाले.
५१ हजार वाहने जप्त
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९१,२१७ गुन्हे दाखल झाले असून १८,०४८व्यक्तींना अटक करण्यात आली.तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी २५ लाख रुपयांचा दंड आकारला आला.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८२,८९४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६३० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२५५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ५१,७१९ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७३ घटनांची नोंद झाली असून यात ६५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. त्यांचा या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने ५१ पोलीस अधिकारी व ३१० पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २३ पोलीस अधिकारी व २६ कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या २८पोलीस अधिकारी व २८१ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाले.