मुंबई : गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा राहिला असताना आतापर्यंत मुंबई महापालिकेकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून १,९७३ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ९१८ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे तर १७८ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. ५८८ अर्जांची पडताळणी अद्याप सुरू आहे.
मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशी तीन हजार मंडळे दरवर्षी मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेत असतात. त्यानुसार महापालिकेने गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी १४ जुलैपासून अर्ज मागविण्यास सुरुवात केली.
मात्र, यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत १,९७३ सार्वजनिक मंडळांनी पालिकेकडे अर्ज केले आहेत. यापैकी २८९ अर्ज दोनवेळा आल्याने रद्द ठरले तर ९१८ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. गेल्यावर्षी अनेक लहान - लहान मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला होता. हे चित्र यंदाही कायम असण्याची शक्यता आहे.