मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, ८० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात आतापर्यंत ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज चार लाख नागरिकांचे लसीकरण केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची राज्य सरासरी १२.३ टक्के असून, भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. मुंबईत आतापर्यंत १४ लाख दहा हजार ५३७, पुण्यात ११ लाख १४ हजार ४०, ठाण्यात पाच लाख ९७ हजार ९७० लाभार्थींना लस देण्यात आली आहे.
राज्यात ५ एप्रिल रोजी दिवसभरात चार लाख ३० हजार ४९२ नागरिकांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १५ लाख २९ हजार ५७० आरोग्य कर्मचाऱ्यांचे, ११ लाख ९६ हजार ६५१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे, तर ४५हून अधिक वय असणाऱ्या ५३ लाख ९५ हजार १११ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले.
......................