Join us

आतापर्यंत कोविडवरील पाच लाख ३१ हजार लसींचा साठा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडवरील लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील एक लाख १४ हजार २०७ जणांना आतापर्यंत लस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविडवरील लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील एक लाख १४ हजार २०७ जणांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. यापैकी ९० हजार ३४ आरोग्य कर्मचारी असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या २४ हजार १७३ एवढी आहे. महापालिकेला आतापर्यंत पाच लाख ३१ हजार १०० कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्या आहेत.

मुंबईत १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाड आणि कर्मचाऱ्यांमधील संभ्रमामुळे या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र, कोणत्याही केंद्रात जाऊन लस घेण्याची मुभा आणि कर्मचाऱ्यांच्या समुपदेशानंतर लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे.

पहिल्या टप्प्यात नऊ अद्ययावत लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली. यात आता १४ अतिरिक्त लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत, तर या केंद्रात दररोज १२,५०० लाभार्थ्यांना लस मिळेल एवढी क्षमता वाढवण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी रोजी लसीकरणाचा दुसरा टप्पा कोविड आघाडीवर काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आला. पालिकेने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी २३ लसीकरण केंद्रांमध्ये १२५ बूथ सुरू केले आहेत. आवश्यकतेनुसार त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे.

* असे झाले लसीकरण

- वैद्यकीय अधिकारी: ११,६७९

- परिचारिका व पर्यवेक्षक: ५,६१४

- इतर वैद्यकीय कर्मचारी : ५,३१६

- शास्त्रज्ञ : १९२

- वैद्यकीय विद्यार्थी: १,२६१

- क्षेत्रीय वैद्यकीय कर्मचारी: १,८९६

- प्रशासकीय कर्मचारी: ३,३५५

- इतर आरोग्य कर्मचारी : ९,२७०

- इतर : ३८,५८३

कोविन डॅशबोर्डनुसार झालेल्या लसीकरणात ५२ टक्के स्त्री आरोग्य कर्मचारी व ४८ टक्के पुरुष आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे.