Join us  

'... तर देव मला माफ करणार नाही'; कीर्तिकरांनी शिवसेनेबाबत निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 2:02 PM

खासदार कीर्तिकर यांनी दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि नंतर या दोघांमध्ये सुमारे १० मिनीटे चर्चाही झाली होती

नवी दिल्ली - शिंदे गटातील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले असतांना आता शिवसेना नेते,स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता किर्तीकर यांनी स्पष्टपणे भूमिका मांडल्याने आता गजानन किर्तीकर हे शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

खासदार कीर्तिकर यांनी दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि नंतर या दोघांमध्ये सुमारे १० मिनीटे चर्चाही झाली होती. यापूर्वी दोघांची दि,२१ जुलै रोजी कीर्तिकर यांच्या निवासस्थानी भेट झाली होती. कीर्तिकर यांचे उजव्या पायाचे दि,१३ जुलै रोजी माहिम येथील रहेजा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले होते. त्यामुळे दि,२१ जुलैला  दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कीर्तिकर यांच्या गोरेगाव ( पूर्व )आरे रोड येथील स्नेहदीप सोसायटी येथील निवासस्थानी भेट देवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या सातत्याच्या भेटीमुळे किर्तीकर शिंदे गटात सहभागी होतील, अशी चर्चा रंगली. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतेच गजानन किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात सामील होण्यास वडिलांना त्यांनी विरोध केला. शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संकटात आहे. अशावेळी आपण उद्धव साहेबांना सोडलं तर देव मला माफ करणार नाही, जगात माझ्यासारखा मतलबी माणूस सापडायचा नाही' अशी भावना अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केली. त्यानंतर कीर्तिकरांनी आपला निर्णय बदलल्याचं वृत्त 'सरकारनामा' न्यूज वेबसाईटने दिलं आहे. 

शिंदे गटाकडून गजाजन कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रिपद तर सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे, आता कीर्तिकर यांनी शिवबंधनातच राहायचं ठरवलं आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेगजानन कीर्तीकरशिवसेनाउद्धव ठाकरे