मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई... मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? असा खोचक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच, जेवढी तत्परता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही असा सवालही त्यांनी विचारला आहे. मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले. मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे. परंतु नीरव मोदी... विजय मल्ल्या... यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्यांची मोठी तुकडी कार्यरत आहे, असेही मलिक म्हणाले. मेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता उपस्थित करत आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना का तत्परता मोदींनी दाखवली नसल्याचा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे मलिक यांनी म्हटले.
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय
मेहुल चोक्सीने केलेली याचिका वैध नसून, त्याला भारताकडे सोपवावं, अशी स्पष्ट भूमिका डोमिनिका सरकारने न्यायालयात मांडली आहे. मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवले जाणार की नाही, याबाबत उद्या न्यायालय निकाल देणार आहे. मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर बुधवारी स्थगित करण्यात आली. मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण होणार की नाही, यावर आज निर्णय देण्यात येणार आहे. डोमिनिका येथील स्थानिक न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरू असून, मेहुल चोक्सी देखील ऑनलाईन हजर होता. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.