...म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 08:23 AM2020-02-01T08:23:46+5:302020-02-01T08:24:48+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं, भिन्न विचारधारेच्या पक्षांसोबत कसे गेलात.
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्रिपद पटकावल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली रोखठोक मुलाखत सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचे प्रोमो प्रसिद्ध केले जात आहे. यामध्ये मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं असं विधान मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी केलं आहे.
या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं की तुम्ही एक्सिडेंटल चीफ मिनिस्टर आहात असा आरोप विरोधकांकडून होतो त्यावर ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं असा प्रचार केला जातो त्यावरही भाष्य केलं आहे. आज हिंदुत्वाचं काय झालं विचारणाऱ्यांनो मी काय धर्मांतर केलंय? असा सवाल त्यांनी केला. तसेच गुलाबाचा गुलकंद हा अनेकांना ज्यांना बद्धकोष्ट असतो त्यांच्यासाठी उपचारसुद्धा असतो असा टोलाही विरोधकांना लगावला.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं, भिन्न विचारधारेच्या पक्षांसोबत कसे गेलात. मग पक्ष फोडून माणसं तुम्हाला चालतात मग त्या पक्षासोबत हात मिळवला तर काय झालं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. हे सरकार अनैतिक आहे असा आरोप करता मग असं मी तुमच्याकडे काय मागितलं होतं. आकाशातील चंद्र, तारे तर मागितले नव्हते असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ही संपूर्ण मुलाखत सोमवारपासून लोकांना वाचायला मिळणार आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या विधानावरुनही उद्धव ठाकरेंनी चिमटा काढला. मी येईन असं कधी बोललो नव्हतो, मी येईन असं मलाही वाटलं नव्हतं तसं जनतेलाही वाटलं नव्हतं. पण मी घडविणारा आहे बिघडवणारा नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.
राज्यातील सत्तासंघर्षामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाला. शिवसेनेने कट्टर विरोधी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं. शिवसेनेने निवडणूक निकालानंतर घेतलेल्या पवित्र्यामुळे भाजपाही आक्रमक झाली. शिवसेनेने विश्वासघात केला असा आरोप भाजपा नेत्यांकडून वारंवार केला जातो तर भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही, आमची फसवणूक केली असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतो.