मुंबई - औरंगाबादचे खासदार आणि एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत पुन्हा युती करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, माझ्याकडून काय चुकंलं, मी बाळासाहेब यांना मोठ्या भावाचा दर्जा दिला आहे. मी त्यांना मोठा भाऊ मानतो. त्यामुळे मी सभा घेऊन त्यांची माफी मागेन, असे इम्तियाज यांनी म्हटलंय. मी केवळ एक फोन करुन बाळासाहेबांना लवकरात लवकरच आपलं सीट घोषित करा, म्हणजे कामाला लागता येईल, असे म्हटले होते.
लोकसभा निवडणुकीत युती करून निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील वाद काही संपुष्टात आला होता. वंचित बहुजन आघाडीकडून फक्त आठ जागांची ऑफर असल्याने आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं जलील यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांकडून, जलील हे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे ऐकत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, जलील यांनी पुन्हा एकदा वंचितसोबत येण्याचं वक्तव्य केलं आहे.
मी जागांबाबत बोलल्यानंतर बाळासाहेब यांनी मी इम्तियाज जलिलशी बोलणार नाही, असे म्हटले. जर, मला बाळासाहेबांनी सांगितलं की, मी याच्यामुळे तुझ्याशी बोलणार नाही. तर, मी त्यांचा आदर करतो, मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागतो. पण, त्यांनी माझ्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आता असं म्हणू शकत नाही की, त्यांना बोलायंचय, असं इम्तियाज जलिल यांनी एका स्थानिक चॅनेलवर बोलताना म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आम्हाला केवळ 8 जागांची ऑफर देण्यात आली. याबाबत मी असुदुद्दीन औवेसी यांच्याशी बोललो, त्यावेळी त्यांनीही 8 जागांना नकार दिला. मात्र, लोकसभेवेळी पुण्यात झालेल्या बैठकीनंतर असुदुद्दीन औवेसी यांनी एमआयएमचे सर्वच खासदार वंचित बहुजन आघाडीच्या झोळीत टाकतो, असे म्हटले होते. आम्ही वंचितला सोडून गेलो, पण कुठल्या मजबुरीमुळे गेलो हेही लक्षात घ्यायला हवा. आम्ही लहान भावाप्रमाणे आहोत, आम्हाला रागवा, खवळा, एखादा फटका मारा, असेही इम्तियाज यांनी म्हटलंय.