मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याबद्दल खुलासा केला आहे. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या राजानाम्याचं गुढ अजित पवारांच्या तोंडूनच उलगडलं आहे. आमचे बोर्ड जेव्हा बरखास्त झालो तेव्हा बिनविरोध निवडून आलेले होतो. माझ्याआधी पुणे जिल्ह्यातून दिलीप पळसे पाटील होते. राजकीय नेतेच नाहीत तर अन्य लोकही होते. चौकशी लागली त्यावर काही बोलायचे नाही. सभागृहात 1 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला. याचिका दाखल करण्याचा सर्वांना अधिकार आहे, असे म्हणत अजित पवारांनी याचिकाकर्त्यांचे स्वागत केले.
याचिकाकर्त्यांनी 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याच आरोप केला. ज्या बँकेच्या ठेवी 10-12 हजार कोटी आहेत त्या बँकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होऊ शकतो. नुकतीच पंजाब महाराष्ट्र बँकेवर बंदी आली आहे. अनेक राजकीय नेते आधीपासून राज्य बँकेवर होते. त्यांच्या काळातही साखर कारखाने, सूतगिरण्या विक्रीला काढण्यात आल्या. राज्य बँक ही शिखर बँक आहे. एखादा सरकारी साखर कारखाने, सूतगिरण्या दुष्काळ किंवा अन्य संकटामुळे अडचणीत येतात तेव्हा आऊट ऑफ दी वे जाऊन मदत करावी लागते. या राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच चार कारखान्यांना मदत केली आहे. केंद्र सरकारही करते. माझ्या काळात जे कर्जवाटप झाले ते फिटलेले आहे. सरकारने हमी दिली होती. कर्ज कारखाने विका आणि कर्ज फेडण्याचे आदेश होते. यामुळे कारखाने विकण्यात आले. आज ही बँक 285 कोटी नेट प्रॉफिटमध्ये आहे. मग 25 हजार कोटींचा घोटाळा झाला तर ही बँक बुडाली नसती का, असे पवार म्हणाले. राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात शरद पवारांचा काडीचा संबंध नाही, दुरान्वये संबंध नाही. मात्र, त्यांचे नाव यात आल्याने मी अस्वस्थ झालो होतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांची भेट झाली. या भेटीला सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. तब्बल दीड तास पवार कुटुंबीयाची चर्चा सुरू होती. त्यानंतर अजित पवारांनी बाहेर येताच माझी भूमिका धनंजय मुंडे स्पष्ट करतील, असे सांगूत ते निघून गेले. तर दुसरीकडे, आमच्या कुटुंबात आईपासून एक पद्धत आहे. सर्व कुटुंबीय मिळून चर्चा करतात. ती चर्चा फक्त राजकीय होती असे नाही, काही कौटुंबिक चर्चाही होत असतात. चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही, अजित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील. सहकाऱ्यांशी बोलून ते अंतिम निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्यावर मौन सोडले आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान अजित पवारांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना राजीनामा मेल केला. त्यानंतर, अध्यक्ष बागडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून ‘‘आपल्याकडे मी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारावा,’’ अशी विनंती केली. बागडे यांनी पत्रकारांना सांगितले की, योग्य फॉरमॅटमध्ये अजित पवार यांनी राजीनाम्याचे पत्र दिल्याने मी तो स्वीकारला. याबाबतचे वृत्त मीडियात येताच, राज्यात खळबळ उडाली होती. अनेकांनी अजित पवारांचा राजीनामा हे गृहकलह असल्याचं मत व्यक्त केलं होतं. तर, शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनामा दिला, असे पार्थ यांनी शरद पवारांना सांगितले होते, ते पवारांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.