Join us  

... म्हणून लसीचा दुसरा डोस 30 दिवसांतच घेतला, टोपेंकडून टीकाकारांची बोलती बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 4:11 PM

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशात लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली आहे. मात्र, लशींचा तुटवडा आणि लसीकरण केंद्रांवरील रांगांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देमी 'कोवॅक्सिन' लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ३० व्या दिवशी दुसरा डोस  घेतला.

मुंबई - कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, केंद्राकडून कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट 84 दिवसांनंतरच दिली जाणार आहे. त्यामुळे, दुसरा डोस घेतलेल्यांना 84 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 30 दिवसांतच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यानंतर, सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. आता, स्वत: आरोग्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण दिलंय.   

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशात लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली आहे. मात्र, लशींचा तुटवडा आणि लसीकरण केंद्रांवरील रांगांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात, कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी वाढवून 84 दिवसांवर नेण्यात आला आहे. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 30 दिवसांतच दुसरा डोस घेतल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत होती. अखेर, राजेश टोपे यांनीच याबाबत ट्विट करुन स्पष्टीकरण दिलंय.

मी 'कोवॅक्सिन' लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ३० व्या दिवशी दुसरा डोस  घेतला. दोन डोसमध्ये सुमारे ८० दिवसांचे अंतर ठेवण्याचा नवा नियम 'कोविशिल्ड' लसीसाठी आहे. 'सुज्ञांस अधिक सांगणे न लगे'...., असे ट्विट राजेश टोपे यांनी करुन टीकाकारांचे तोंड बंद केले. 

लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी

कोव्हिड प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर नागरिक रोजच हातघाईवर येत आहेत. एकदा लस घेतल्यानंतर दोन डोसमध्ये नेमके किती अंतर असावे, असा प्रश्नही ग्रामस्थांना सतावतो आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने स्पष्ट नियोजन जाहीर केले आहे. ग्रामीण भागात लशींच्या तुटवड्यावरून नागरिकांत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. लॉकडाउन असूनदेखील रोजच या केंद्रांवरील गर्दी नियंत्रणात आणताना यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहेत. या स्थितीत लसीकरणाबाबत केंद्र व राज्याकडून मिळालेल्या नव्या सूचनांनुसार कोव्हिशील्डच्या लशीबाबत नवीन निर्देश देण्यात आले आहेत.

'कोव्हॅक्सिन' चार आठवड्यांनंतरच

कोव्हॅक्सिन लशीच्या दुसऱ्या डोसबाबत नियमांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस पूर्वीप्रमाणेच चार आठवड्यांनी देण्यात येणार आहे. याशिवाय वयोगट १८ ते ४४ मधील लाभार्थींचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र लाभार्थींनीच ऑनलाइन नोंदणीच्या कन्फर्मेशननंतरच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहनही स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.  

टॅग्स :राजेश टोपेकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याट्विटरसोशल मीडिया