Join us

Maharashtra Cabinet Expansion : ... म्हणून मी शपथविधीला गैरहजर होतो, राऊतांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 8:19 AM

महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : मी सकाळपासून सामना कार्यालयात बसून काम करत आहे. मला असं सांगाव की मी कधी अशा कार्यक्रमांना हजर राहिलो आहे.

मुंबई - राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा बराच काळ रखडलेला शपथविधी अखेर सोमवारी झाला. या शपथविधीनंतर सरकारस्थापनेत मोलाचा वाटा उचलणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे वृत्त आले होते. मात्र, आपल्या कुटुंबात कुणीही नाराज नाही, आम्ही काहीही मागणी केली नव्हती. आम्ही मागणारे नव्हे तर पक्षाला योगदान देणारे आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच, आपल्या अनुपस्थितीच कारणही राऊत यांनी सांगितलं. 

मी सकाळपासून सामना कार्यालयात बसून काम करत आहे. मला असं सांगाव की मी कधी अशा कार्यक्रमांना हजर राहिलो आहे. सरकारी कार्यक्रम, मंत्रालयातील कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम, प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम, विस्ताराचे कार्यक्रम. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात अशाप्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमांना हजर राहिलो नाही. फक्त 1 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना मी हजर राहिलो, हा एक अपवाद आहे. तेही शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, उद्धव ठाकरे शपथ घेतायंत म्हणून मी आजारी असतानाही तिथे थांबलो होतो. पण, त्याच्या आधी किंवा नंतर मी शासकीय कार्यक्रमाला कधीच हजर राहिलो नाही. मला बोलवतात, पण माझा तो पिंड नाही, असे म्हणत मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला गैरहजर असण्याचं कारणच नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. संजय राऊत यांनी बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना आपण नाराज नसून आम्ही शिवसेनेत होतो, आणि राहू. आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यापुढं मंत्रीपद काहीच नाही, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना देखील मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शिवसेनेकडून जाहिर केलेल्या मंत्रिमंडळाच्या यादीत सुनिल राऊत यांना स्थान नसल्याचे समोर आल्यानंतर सुनील राऊत हे नाराज झाल्याचे वृत्त पसरले. तसेच या नाराजीमुळेच संजय राऊत हे शपथविधीला अनुपस्थित राहिले, अशी चर्चा रंगली होती. मात्र नाराजीचे हे वृत्त संजय राऊत यांनी खोडून काढले.

दरम्यान, ''हे सरकार तीन पक्षांच्या आघाडीचे आहे. त्यामुळे आपल्याकडे पर्याय मर्यादित आहेत हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. तिन्ही पक्षात दिग्गज मंडळी आहे. त्यामुळे आमच्या पक्षातील लोकांनी धीर घरला पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे.'' असेही संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांचे नाराज बंधू सुनील राऊत यांना काहीतरी जबाबदारी देऊ, अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामंत्रीमंत्रिमंडळ विस्तारमहाराष्ट्र सरकार