Join us

... तर वेळ पडल्यास हा लढा आम्ही संसदेपर्यंत घेऊन जाऊ - प्रीती शर्मा मेनन 

By मनोहर कुंभेजकर | Published: April 11, 2023 4:45 PM

धारावी बेट बचाव समितीद्वारे गोराई बेट येथे राहणाऱ्या रहिवाश्यांच्या सामाजिक समस्यांबद्दल गोराई बेटावरील गोराई चर्चच्या आवारात काल रात्री सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुंबई : गोराई बेट हा विभाग मुंबईतील सर्वात सुंदर स्थळांपैकी एक आहे. या गोराईच्या भूमीपुत्रांच्या जमिनी बळकावण्याचा घाट सत्ताधारी भांडवलदार नेत्यांनी घातला आहे. गोराईकरांचा हा लढा आम आदमी पार्टी व्यापक स्वरूपात नेऊन लढणार असून वेळ पडल्यास आम्ही गोराईच्या भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी हा लढा आम्ही संसदेपर्यंत घेऊन जाऊ, असे आश्वासन आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी गोराई, कुलवेम व मनोरी, उत्तनच्या नागरिकांना दिले.

धारावी बेट बचाव समितीद्वारे गोराई बेट येथे राहणाऱ्या रहिवाश्यांच्या सामाजिक समस्यांबद्दल गोराई बेटावरील गोराई चर्चच्या आवारात काल रात्री सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. या सभेला  सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा, वनशक्तिचे दयानंद स्टॅलिन, पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डावरे,धारावी बेट बचाव समितीच्या सचिव लुड्स डिसोझा व नेव्हिल डिसूझा. गोराई मच्छीमार सोसायटी चे काशु लोटोलिया, ओल्डरीन वसईकर,गोराई  होली मझाई चर्चचे फादर एडवर्ड जसिंतो, उत्तन कोळी जमातीचे डिक्सन डेमकरतसेच आम आदमी पार्टी मुंबईचे पदाधिकारी व येथील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोराई बेटाला मुंबईला जोडण्यासाठी चारपदरी उड्डाणपूल बनवण्यासाठी एमएमआरडीए व मुंबई महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. येथील भाजपचे स्थानिक आमदार सुनील राणे यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. गोराई बेटाचा विकास करण्यासाठी या चारपदरी उड्डाणपुलाची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण या उड्डाणपुलांचा खरोखरच येथील रहिवाश्यांना फायदा होईल का? हा खरा प्रश्न आहे. तसेच समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी बनविण्याचा प्रकल्प सुरू केला जात असल्याचे सांगितले जात आहे. 

या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे जे क्षारयुक्त पाणी उरेल ते सर्व पाणी येथील समुद्रात सोडून येथील समुद्रातील जैवविविधतेसाठी अत्यंत धोकादायक आहेत. जर हा उड्डाणपुल तयार झाला व हा खाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प सुरू झाला तर गोराई बेटाची स्थिती वरळी कोळीवाडा, खारदांडा, जुहू गाव सारखी होईल. ज्या प्रकारे विकासाच्या नावाखाली शासनाने वरळी कोळीवाड्याला झोपडपट्टी बनवले, खार दांड्याला झोपडपट्टी बनवले, जुहू कोळीवाड्याला झोपडपट्टी बनवले. गोराई बेटाची देखील तशीच दशा करण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे. हा आमदार सुनील राणे, एमएमआरडीए व मुंबई महानगरपालिकेचा हा मुजोरपणा असून त्याचा आम आदमी पार्टीने निषेध करत आहे, असे प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या. 

प्रीती शर्मा मेनन पुढे म्हणाल्या की, इथले एक तलाव आहे जे २०० वर्षे जुने आहे त्या तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली आमदार सुनील राणे यांच्या अधिपत्याखाली शासनाचे लोक त्या तलावाचे काँक्रीटीकरण करू पाहत आहेत. या सुशोभीकरणासाठी येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. येथील रहिवासी व आदिवासी या तलावाचा वापर आपल्या गुरा-ढोरांना पाणी पाजण्यासाठी, त्यांना धुण्यासाठी, अंघोळीसाठी, शेती-बागायती करण्यासाठी, मासेमारी जाळी धुण्यासाठी करतात. या तलावाचे सुशोभीकरण करून येथील मूळ रहिवाश्यांना या तलावातील पाणी वापरण्यास बंदी घालण्याचा घाट आमदार सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडून घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :मुंबई