'मग तो शिंदेंचा जुळा भाऊ आहे का?' सुषमा अंधारेंची CM अन् गुलाबराव पाटलांवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 11:58 AM2022-10-15T11:58:19+5:302022-10-15T11:58:32+5:30
महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनीही लाव रे तो व्हिडिओ .. म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जुना व्हिडिओ उपस्थित लोकांसमोर झळकावला
मुंबई - उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटातील नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांच्या महाप्रबोधन यात्रेची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवसेनेतील हे नेते आक्रमक शैलीत भाषण करताना शिंदे गटातील नेत्यांवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधत आहेत. त्यातच, सुषमा अंधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत, देवेंद्र फडणवीसांवरही टिकेची झोड उठवताना दिसून येताता. आता, पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका केली आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या सभेत एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनीही लाव रे तो व्हिडिओ .. म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जुना व्हिडिओ उपस्थित लोकांसमोर झळकावला. एका सभेत भाषण करताना एकनाथ शिंदें थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला होता. त्यावेळी, भाजपकडून होणाऱ्या अन्यायावर त्यांनी भाष्य केलं होतं. तसेच, मी अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. मी एक शिवसैनिक आहे, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं. हा व्हिडिओ दाखवल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रश्न विचारला. हे दादा कोण आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जुळे भाऊ तर नाहीत ना? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला होता. लोकं डोसक्याला गोडं तेल नाहीत लावत, त्यांना कळतं राजकारण, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंवर जबरी टीका केली.
गुलाबराव पाटील..., ५० वेळा सांगितलं त्यांनी की, मी पानटपरीवाला होतो. मी पानटपरीवाला होतो, मी टपरी चालवत होतो. मला मातोश्री आणि बाळासाहेबांनी मोठं केलं. टपरीवाल्यांना एवढ्या मोठ्या मंत्रीपदावर बसवलं. मग, टपरीवाले दादा अशी का टपरी भाषा करता तुम्ही. टपरीवाल्या दादांबद्दल मला आदर आहे. पण, त्यांची भाषा जेव्हा बिघडते, तेव्हा त्यांना काय सांगायचं समजावून असे म्हणत गुलाबराव पाटील यांच्यावरही सुषमा अंधारेंनी बोचरी टीका केली.
सुषमा अंधारे, भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल
सुषमा अंधारे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केल्यामुळं भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. तसेच नारायण राणे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याने विनायक राऊतांवर गुन्हा नोंदविण्यात आलाय. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला आहे. जो कोणी सत्य बोलेल त्याला भीती दाखवली जाते, त्यामुळे धक्का बसण्यासारखं काही नाही, असं त्यांनी म्हटलं.