Join us

...म्हणून ‘तो’ बनला मुलगी! ‘फेक’ अकाउंटचा घेतला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 4:59 AM

फेसबुकवर मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाहून तरुणाने ती स्वीकारली. दोघांमध्ये संभाषण वाढले. मुलीने थेट भेटायला बोलावले म्हणून हादेखील नटूनथटून गेला. समोरून मुलीने हात दाखवून जवळ बोलावले आणि तेथे पोहोचताच पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला बेदम चोप दिला. त्याच्याकडील पैसे घेऊन पसार झाले.

मुंबई : फेसबुकवर मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाहून तरुणाने ती स्वीकारली. दोघांमध्ये संभाषण वाढले. मुलीने थेट भेटायला बोलावले म्हणून हादेखील नटूनथटून गेला. समोरून मुलीने हात दाखवून जवळ बोलावले आणि तेथे पोहोचताच पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला बेदम चोप दिला. त्याच्याकडील पैसे घेऊन पसार झाले. क्षणभर काय आणि कशासाठी झाले, हे त्यालादेखील उमगले नाही. अखेर तपासात काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत पार्किंगवरून त्यांच्यात वाद झाला. या वेळी तक्रारदार तरुणाने आरोपीच्या काकावर हात उगारला होता. याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडले. यामार्फत तक्रारदाराची फसवणूक करत त्याला मारहाण करून लुटले.चेंबूरच्या माहूल गावातील गव्हाणपाडा परिसरात राहत असलेल्या हितेंद्र उर्फ बाबू ठाकूर याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. ८ जानेवारी रोजी त्याला अनोळख्या मुलीची फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्याने ती स्वीकारली. दोघांचेही फेसबुक मेसेंजरवर बोलणे सुरू झाले. १६ जानेवारीला मुलीने त्याला गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलावले. ठाकूरही तेथे वेळेत हजर झाला. लांबून एका मुलीने हात दाखवून त्याला बोलावले. तीच मुलगी असावी म्हणून तो जवळ गेला. तेव्हा पाच ते सहा जणांच्या घोळक्याने त्याला लोखंडी रॉड आणि स्टंपने चोप दिला आणि त्याच्याकडील ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. घटनेची वर्दी लागताच देवनार पोलिसांनी ठाकूरच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत देवनार पोलिसांसह मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अमित भोसले, पोलीस शिपाइ4महेश मोहिते, चंद्रकांत वेलकर, दत्तात्रय कोळी यांनी तपास सुरू केला.त्यांनी शिताफीने या प्रकरणात तीन जणांना शनिवारी बेड्या ठोकल्या. तेव्हा त्यांच्या चौकशीत यामागील धक्कादायक बाब उघडकीस आली. काही दिवसांपूर्वी ठाकूरचे आरोपी तरुणासोबत पार्किंगवरून वाद झाला होता. यादरम्यान ठाकूरने त्याच्या काकावर हात उगारला. या वेळी बघून घेण्याची धमकी घेत आरोपी निघून गेला. मात्र, ठाकूरला धडा शिकविण्यासाठी त्याने सुरुवातीला त्याच्यासोबत फेसबुकवरून मुलगी म्हणून मैत्री केली आणि संधी साधून भेटण्याच्या बहाण्याने त्याच्यावर हल्ला चढविला. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याने पोलिसांनी त्या आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला. या गुन्ह्यांत हात दाखवणारी मुलगी आरोपीची मैत्रीण असल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मालमत्ता कक्षाने दिली.‘फेक’ अकाउंटचा घेतला आधारबदला घेण्यासाठी आरोपीने मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडले. मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाहून तरुणाने ती स्वीकारली. दोघांमध्ये संभाषण वाढले. मुलीने थेट भेटायला बोलावले म्हणून हादेखील नटूनथटून गेला. समोरून मुलीने हात दाखवून जवळ बोलावले आणि तेथे पोहोचताच पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला बेदम चोप दिला. त्याच्याकडील पैसे घेऊन पसार झाले.

टॅग्स :मुंबई