...तर चतुर्थीपूर्वी सिंधुदुर्गातून विमान उड्डाण शक्य - राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:05 AM2021-07-21T04:05:59+5:302021-07-21T04:05:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : येत्या आठ ते १० दिवसात सिंधुदुर्गात डीजीसीएचे पथक पाठवून चीपी विमानतळाच्या परवान्यासंदर्भात निर्णय घेण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या आठ ते १० दिवसात सिंधुदुर्गात डीजीसीएचे पथक पाठवून चीपी विमानतळाच्या परवान्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन नवनिर्वाचित हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्याला दिले आहे. त्यानुसार कृती झाल्यास चतुर्थीपूर्वी सिंधुदुर्गातून विमान उड्डाण शक्य असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
राऊत यांनी सोमवारी मंत्री शिंदे यांची भेट घेत चिपी विमानतळासंदर्भात चर्चा केली. नागरी उड्डाण संचालनालयाच्या (डीजीसीए) निकषांनुसार धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. चीपी विमानतळाच्या उभारणीचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीने २८ जून २०२१ रोजी परवाना मिळण्याबाबत डीजीसीएकडे अर्ज सादर केला आहे. आपण यात हस्तक्षेप केल्यास परवानगीची प्रक्रिया सुलभ होईल, अशी विनंती राऊत यांनी शिंदे यांच्याकडे केली.
‘याबाबत ८ ते १० दिवसात रिझर्ल्ट देतो’, असा शब्द हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिला आहे. त्यानुसार डीजीसीएच्या पथकाने धावपट्टीची पाहणी करून हिरवा कंदील दाखविल्यास गणेशचतुर्थीपूर्वी चीपी विमानतळावरून विमान उड्डाण शक्य असल्याचे राऊत यांनी सांगितले.
डीजीसीएने मार्च महिन्यात धावपट्टीच्या कामाबाबत आक्षेप घेतल्याने चीपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला होता. आता आयआरबीने डीजीसीएच्या निकषांनुसार धावपट्टीत बदल केल्याचा दावा केला आहे. परंतु, हवाई वाहतूक मंत्र्यांनी शब्द दिला असला तरी, डीजीसीएच्या पथकाचे समाधान झाल्याशिवाय उड्डाणास परवानगी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.