म्हणून आयटीआय राबवतंय प्रवेश प्रोत्साहन अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:09 AM2021-08-25T04:09:23+5:302021-08-25T04:09:23+5:30

सीमा महांगडे मुंबई राज्यात २४ ऑगस्टपर्यंत आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ लाख २३ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. ...

So ITI is implementing an admission promotion campaign | म्हणून आयटीआय राबवतंय प्रवेश प्रोत्साहन अभियान

म्हणून आयटीआय राबवतंय प्रवेश प्रोत्साहन अभियान

googlenewsNext

सीमा महांगडे

मुंबई

राज्यात २४ ऑगस्टपर्यंत आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ लाख २३ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना यंदाच्या आयटीआय प्रवेशासाठी अजून ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली नोंदणी कमी असल्याने आयटीआय संचालनालयाकडून प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयटीआय पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

मागील वर्षी आयटीआयसाठी तब्बल ३ लाख ३२ हजार २१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा अर्ज निश्चिती करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अद्याप २ लाख १७ हजार असून, यात वाढ होण्याची अपेक्षा संचालक दिगंबर दळवी यांनी केली आहे. मागील वर्षीच्या उपलब्ध जागा आणि अर्जनोंदणी यांची तुलना यंदाच्या वर्षी उपलब्ध असलेल्या उपलब्ध जागा आणि अर्ज नोंदणी यांच्याशी केली असता यंदा अर्ज नोंदणीत घट झाल्याचे दिसून आले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रादेशिक आयटीआय कार्यालयांच्या सहसंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. या अभियानांतर्गत सर्व ग्रामीण व दुर्गम भागात आयटीआय प्रवेशाबाबतची माहिती उपलब्ध करून देणे, स्थानिक प्रसार माध्यमांचा तसेच सामाजिक प्रसार माध्यमाचा वापर करून आयटीआयमधील व्यावसायिक अभ्यासक्रम, त्यातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी याची इत्यंभूत माहिती प्रवेशास इच्छुक उमेदवाराला देणे आणि मार्गदर्शन करणे याचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

म्हणून आयटीआय नोंदणीत घट

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे दहावीनंतर स्थलांतर, ढासळलेली आर्थिक परिस्थिती या सगळ्यांचा परिणामही सगळ्याच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांवर होत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

-----

कोरोनाचा काळ नियंत्रणात येत असताना दहावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याकडे सध्या विद्यार्थ्यांचा कल आहे. नोकरी मिळाली नाही तरी या अभ्यासक्रमामुळे व्यवसाय सुरू करता येईल, या हेतूने विद्यार्थी आयटीआयकडे पाहतात. अर्ज नोंदणीत अजून वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दिगंबर दळवी, संचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालय.

----

विद्यार्थ्यांचे तळ्यात मळ्यात

आयटीआयला प्रवेश घ्यायचा असल्याने तूर्त ऑनलाइन नोंदणी केली आहे. सध्या अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनासारखे महाविद्यालय मिळाले नाही तर शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहे.

- शिवराज कांबळे, विद्यार्थी.

--------------

अकरावी आणि आयटीआय दोन्हीसाठी अर्ज करण्याचा विचार सुरू आहे. आयटीआयचे मुदत अद्याप संपली नसल्याने तो पर्याय ही खुला ठेवणार आहे.

गौरव खाडे, विद्यार्थी.

----------------

संस्था - मुंबई जिल्ह्यातील संस्थांची संख्या - एकूण जागा

शासकीय -६७- १६५६५

खासगी -३९-३९९२

एकूण - १०६- २०६४८

-----

मुंबई शहरातील अर्जाची स्थिती

अर्जसंख्या -निश्चित अर्ज - २०२० मधील निश्चित अर्ज

५४१७-५१८०- ६४१०

------

राज्यातील स्थिती

एकूण जागा - १ लाख ४९ हजार २९६

आलेले अर्ज - २२३४४४

२०२०मधील अर्जसंख्या - ३३२२१८

Web Title: So ITI is implementing an admission promotion campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.