मुंबई - शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर कारवाई केली. दरम्यान कंगनाच्या कार्यालयावरील महानगरपालिकेने सुरु केलेली कारवाई तुर्तास थांबवली आहे. कंगना आज मुंबईत पोहोचली, त्यानंतर तिने आपल्या घरातून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. कंगना परराज्यातून मुंबईत आल्यामुळे तिला क्वारंटाईन करण्यात येणार होते. मात्र, कंगनाला क्वारंटाईन करण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय.
दुसर्या राज्यातून विमानप्रवास करून मुंबईत येणाऱ्या प्रवाशाचा मुक्काम सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी असल्यास त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागते, असा राज्य सरकारचा नियम आहे. मात्र, अभिनेत्री कंगना राणौत ही केवळ 6 दिवसांसाठी मुंबईत आहे. त्यामुळे तिला क्वारंटाइनमधून सूट दिल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलारासू यांनी सांगितले. त्यामुळे, कंगनाला क्वारंटाईन राहण्याची गरज नसणार आहे. कंगनाला क्वारंटाईन करण्यात येणार, कंगना 14 दिवस घरातच राहणार अशा चर्चा होत्या. मात्र, आयुक्तांच्या विधानानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
कंगनाच्या समर्थनार्थ भाजपा
कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी शिवसेनवर टीका केली असून ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात येत असल्यचं म्हटलंय. आता, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेवर कंगना प्रकरणावरुन टीका केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एका महिलेवर असा अन्याय योग्य नसून महाराजांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणणाऱ्यांना हे शोभत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे, कुणीही देशात कुठेही जाऊ शकतो, काहीही बोलू शकतो. कंगना काय बोलली याबद्दल मला काही बोलायचं नाही, तिच्या वक्तव्याशी आम्ही सहमतही नाही. पण तिच्या वक्तव्याबद्दल तुम्ही कायदेशीर मार्गाने तिच्यावर कारवाई करा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. महाराजांनी महिलेला सन्मान देणं शिकवलं, पण हे लांडग्यासारखे कंगनाच्या मागे लागलेत, असे म्हणत पाटील यांनी शिवसेनेवर जबर प्रहार केला.
कार्यालयानंतर कंगनाच्या फ्लॅटवर बीएमसीची नजर
मुंबई महापालिकेने दिवाणी न्यायालयाकडे कंगना रानौतचे खारमधील घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. पालिकेचे म्हणणे आहे की कंगनाच्या फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले आहे. मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर डिब्रीझ अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर कंगनाचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने 2018 मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिने दिंडोशी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.
कंगना व शिवसेना यांच्यातील वाद आता विकोपाला
कंगना राणौत व शिवसेना यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. कंगनाच्या कार्यालयावर मुंबई पालिकेने केलेल्या कारवाईनंतर कंगनाचा संताप अनावर झाला असून 12 सेकंदाचा एक व्हिडीओ पोस्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत तिने जोरदार टीका केली आहे.