...तर एआयएमआयएमच्या समर्थकांना ब्लॉक करू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 05:20 AM2020-08-18T05:20:31+5:302020-08-18T05:20:58+5:30
त्यांना ब्लॉक करू, अशी माहिती फेसबुक व युट्युबने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.
मुंबई : केंद्र सरकारने किंवा न्यायालयाने आदेश दिल्यास जातीय वाद निर्माण व्हावेत, या उद्देशाने चिथावणीखोर भाषणे किंवा अन्य गोष्टी पोस्ट करणाऱ्या एआयएमआयएमच्या समर्थकांना संकेतस्थळाचा वापर करू देणार नाही. त्यांना ब्लॉक करू, अशी माहिती फेसबुक व युट्युबने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.
समाजमाध्यमांवर चिथावणीखोर भाषण देणाºया अबू फैजल याच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबईचे रहिवासी इम्रान खान यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे होती. याचिकेनुसार, फैजल हा असदुद्दीन ओवेसीच्या आॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहद- उल-मुस्लिमिनचा अनुयायी आहे.
त्याने समाजमाध्यमांवर अपलोड केलेले व्हिडीओ हटवण्यात यावेत. तसेच त्याला या समाजमाध्यमांचा वापर करण्यापासून कायमची बंदी घालावी, अशी मागणी याचिकादारांच्या वकिलांनी केली.
मे महिन्यात उच्च न्यायालयाने युट्युब व फेसबुकला फैजलने अपलोड केलेले व्हिडीओ हटविण्याचे निर्देश दिले होते. सोमवारी फेसबुक व युट्युबच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, फैजलचे सर्व व्हिडीओ हटवण्यात आले आहेत.
मात्र, याचिकादारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, व्हिडीओ हटवण्यात आले असले तरी फैजल आणखी व्हिडीओ अपलोड करत आहे. केंद्र सरकारने आयटी अॅक्टनुसार प्रक्रिया पार पाडली तर किंवा न्यायालयाने आदेश दिले तर आम्ही फैजलला ब्लॉक करू, असे फेसबुकने उच्च न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.