...तर राज्यात लॉकडाऊन अटळ, सध्या दररोज 4 ते 5 हजार रुग्ण आढळतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 08:44 AM2021-09-07T08:44:10+5:302021-09-07T08:44:54+5:30
रोज ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास परिस्थिती चिघळेल
अतुल कुलकर्णी
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या सध्या रोज साडेचार ते पाच हजार आहे. रोज २० हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघू लागतील त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करावा लागेल. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना दिली आहे.
रोज ३० हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, तर त्यांना व्यवस्थित हाताळण्यात वैद्यकीय यंत्रणा आज सज्ज आहे. मात्र, ही संख्या रोज ४० हजार अशी होऊ लागली, तर मात्र परिस्थिती बिकट होईल. बेड, ऑक्सिजन, औषधी यांची अडचण निर्माण होईल. परिणामी मृत्यूदरही वाढेल असेही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले आहे.
धार्मिक, राजकीय कार्यक्रम स्थगित करा
मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी गर्दी होणारे राजकीय सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. इतर कार्यक्रम नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र, आता तिसरी लाट येऊच द्यायची नाही. सणांवर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचा. उत्सव नंतरही साजरे करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गर्दी होईल असे कार्यक्रम राष्ट्रवादीकडून बंद
गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास पक्षाने मनाई केली आहे. तसे कार्यक्रम होणार नाहीत, ही पक्षाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
थोडीशी बेफिकिरी पडू शकते महागात
गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर लोक प्रवास करीत आहेत. आताच नियम पाळले नाहीत, तर तिसऱ्या लाटेला कोणीही रोखू शकणार नाही. थोडी बेफिकिरी राज्याला प्रचंड मोठ्या संकटात टाकू शकते, याची जाणीव लोकांना करून देण्याचे काम राज्यकर्त्यांचे आहे, असेही एका वरिष्ठ सचिवांनी स्पष्ट केले.
रुग्णवाढीचा आलेख
nएप्रिलमध्ये रोज ५९,६४७ रुग्ण पॉझिटिव्ह निघत होते.
nएप्रिलमध्ये २९,६१३, मे मध्ये २८,६७३ असे दोन महिन्यांत ५८,२८६ लोकांचे मृत्यू झाले.
nसप्टेंबरमध्ये ६ दिवसांत ११३ मृत्यू झाले. १७ सप्टेंबर २०२० रोजी ३,०१,७५२, तर २२ एप्रिल २०२१ रोजी ६,९९,८५८ लोक कोरोना पॉझिटिव्ह होते.
n६ सप्टेंबरला ४७,६९५ एवढे लोक कोरोनाबाधित आहेत.
n१४ ऑगस्टला मुंबईत ३६,५३० तपासण्यांत ३२५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. सहा सप्टेंबरला मुंबईत ३१,५७७ तपासण्या झाल्या. ४४७ रुग्ण निघाले.