Join us

'...तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, पेटून उठल्याशिवाय राहणार नाही', महामोर्चातून शरद पवारांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 2:46 PM

Sharad Pawar: महामोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना परखड शब्दात इशारा दिला. 

मुंबई - राज्यपालांसह भाजपाच्या नेत्यांकडून झालेल्या महापुरुषांच्या अपमानाविरोधात आज महाविकास आघाडीने काढलेल्या महामोर्चाला जोरदार प्रतिसाद मिळाला. या मोर्चात नेत्यांसह लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्य़ान, या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना परखड शब्दात इशारा दिला. 

शरद पवार सभेला संबोधित करताना म्हणाले की, आज हे लाखोंच्या संख्येने शक्ती एकत्र का आली. त्याचं कारण आहे महाराष्ट्राच्या सन्मानासाठी. महाराष्ट्राच्या सन्मानावर हल्ले होत आहे. आज सत्तेवर बसलेले लोक महाराष्ट्राच्या नेतृत्वाविषय, महाराष्ट्राच्या युगपुरुषांविषयी एक वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहेत. संपूर्ण भारताला आत्मविश्वास देण्याचं ऐतिहासिक काम शिवछत्रपतींनी केलं आहे. या देशात अनेक राजे होऊन गेले. अनेकांची संस्थानं झाली. मात्र साडेतीनशे वर्षांनंतर जनतेच्या सामान्य लोकांच्या ओठावर एक नाव कायम आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय. त्या शिवछत्रपतींचा उल्लेख राज्यातील एकादा मंत्री करतो. अन्य कुणी सत्ताधारी पक्षाचे घटक करतात. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. यासंबंधीची तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने तुम्ही येथे आला आहे. आज तुम्ही इशारा दिला. त्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून काय धडा शिकवायचा हे दाखवल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्त बसरणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला. 

शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची काही वैशिष्ट्ये आहेत, काही सन्मानचिन्हे आहेत. महात्मा फुले असोत, शाहू महाराज असो, डॉ. आंबेडकर असोत, कर्मवीर भाऊराव पाटील असोत, ही आमची सन्मानाची, आदराची स्थाने आहोत. आजचे राज्यकर्ते याबाबत काय बोलतात. महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल कधी पाहिले नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन मला ५५ वर्षे झाली. या काळात अनेक राज्यपाल पाहिलेत. त्यांनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचं काम त्यांनी केलं. मात्र यावेळी एक अशी व्यक्ती या ठिकाणी आणली जी महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात आणण्याचं काम करत आहे. महात्मा फुले असो, सावित्रिबाई असोत. त्यांच्याबाबत अनुदगार काढतेय, त्यांना लाज वाटली पाहिजे. अशा व्यक्तींची टिंगल टवाळी करत असतील, तर राज्यपालांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून मी केंद्राला आवाहन करतो की, यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. जर वेळीच हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

यावेळी वादग्रस्त विधानांच्या मुद्द्यावरून भाजपाच्या अन्य नेत्यांवरही टीका केली. ते म्हणाले की, मला गंमत वाटते या राज्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धा सुरू झालीय. ती स्पर्धा कर्तृत्वाची नाही, महाराष्ट्राच्या विकासाची नाही तर महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू आहे. याठिकाणी एका मंत्र्याने उल्लेख केला की, कुणीतरी शिक्षण संस्था चालवायची असेल तर तुम्ही भीक मागा म्हणून, यावेळी त्यांनी नावं घेतली कुणाची तर महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची. कर्मवीरांनी लाखो विद्यार्थ्यांना शिकवले. वसतीगृहे काढली. अशा व्यक्तींविरोधात कुणीतरी गलिच्छ शब्द वापरत असेल, तर त्यांना धडा शिकवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केलं.     

टॅग्स :शरद पवारमहाविकास आघाडीमुंबई