मुंबई - प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करताना अनेकदा अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी मुंबईत पूर्व तसेच पश्चिम उपनगर येथे जमिनीची उपलब्धता होऊ शकते. या जागेवर प्राण्यांच्या मृत्यूनंतर दफनासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
प्राण्यांच्या दफनासाठी मुंबईत जागा निश्चित करण्यासंदर्भात खासदार मनेका गांधी आणि माजी खासदार प्रितेश नंदी यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर तसेच मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले, मुक्या प्राण्यांची सेवा करणे गरजेचे आहे. प्राणी आपली वेदना सांगू शकत नाहीत. रस्त्यावरील गाई, कुत्रे आणि अन्य प्राण्यांसाठी चौकोन पद्धतीने आखणी करून प्राण्यांचे पालन पोषणही करण्यात येईल, असे, आव्हाड यांनी यावेळी सांगितले. खासदार मनेका गांधी म्हणाल्या की, मानव आणि प्राणी एकामेकांसोबत आनंदाने रहावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. याकरिता काही खासगी संस्थांचाही सहभाग असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, भाजपाचे नेते खासदार वरुण गांधी हे पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू असतानाच वरुण गांधींच्या मातोश्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. मनेका गांधी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, आता या भेटीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.