... म्हणून बैठक उपयुक्त झाली, आनंद महिंद्रांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:48 PM2021-04-29T12:48:25+5:302021-04-29T12:48:33+5:30
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगपतींसोबत मंगळवारी कोरोनासंदर्भात व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा जनतेला आणि उद्योगधंद्यांना फटका बसू नये यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा सांगितला.
मुंबई - राज्यातील कोरोनाची विदारक परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेऊन रणनिती आखताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यममंत्र्यांनी राज्यातील उद्योगपतींसोबत बैठक घेतली. या बैठकीचं देशातील प्रमुख उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी विशेष कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महिंद्रा यांनी लॉकडाऊनवरुन मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला दिला होता.
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगपतींसोबत मंगळवारी कोरोनासंदर्भात व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा जनतेला आणि उद्योगधंद्यांना फटका बसू नये यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा सांगितला. तसेच, वेगवान लसीकरण याबाबत उद्योगपतींशी चर्चा केली. या बैठकीतील अनुभव सांगताना आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलंय. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँलडवरुन या बैठकबाबत माहिती देण्यात आली होती. सीएमओने केलेल्या ट्विटला आनंद महिंद्रा रिट्वटि करत उत्तर दिलं आहे.
A meeting from which we emerged feeling we’d spent productive time. Because:
— anand mahindra (@anandmahindra) April 28, 2021
a) No time wasted in ceremonial comments
b) Focused agenda
c) Emphasis on practical/impactful corporate initiatives addressing ground realities
d) Mechanism for followup/coordination established https://t.co/91dDP7bf07
“ज्या पद्धतीने बैठक झाली त्यावरुन आमची ही बैठक उपयुक्त झाली असं वाटतं. कारण...
अ ) औपचारिक किंवा शिष्टाचारी वक्तव्यांमध्ये वेळ वाया घालवण्यात आला नाही.
ब) बैठकीत अजेंडा हा केंद्रस्थानी होता.
क) कोरोना परिस्थितीचं वास्तव लक्षात घेऊन सरकार व कॉर्पोरेटद्वारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवर जोर दिला गेला.
ड) याशिवाय पूर्ण मोहिमेच्या पाठपुरावा व समन्वयासाठी व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला…”
असं ट्विट महिंद्रा यांनी केलंय. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत वेळ वाया न घालवता मुख्य आणि नेमक्या मुद्द्यांवर सल्लामसलत करण्यात आल्याचं सांगत महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय.
यापूर्वी उद्धव ठाकरेंनी दिलं होतं उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray on lockdown) यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनबाबत वक्तव्य करणाऱ्यांचा समाचारही घेतला होता. यात एका उद्योगपतीच्या वक्तव्यालाही उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर दिलं होतं. या उद्योगपतीने लॉकडाऊन करण्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करा असा सल्ला दिला होता. आरोग्य सुविधा वाढवल्याच आहेत आणि त्या वाढवणे सुरुच आहे, पण केवळ आरोग्य सुविधा वाढवून चालणार नाही, तर त्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची गरज आहे. आरोग्य सुविधा हाताळण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासत असते. त्यांचा पुरवठा हे उद्योगपती करणार का? असा टोला देत मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये न करण्याची विनंती केली होती.