इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:41 PM2022-04-23T19:41:26+5:302022-04-23T19:44:44+5:30
Devendra Fadanvis News: दिवसभर चाललेल्या नाट्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली. मात्र आता या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे.
मुंबई - दिवसभर चाललेल्या नाट्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली. मात्र आता या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील घटना ह्या व्यथित करणाऱ्या आहेत. भाजपाच्या पोलखोर रथावर हल्ले झाले, पण आरोपीला अटक झाली नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला, पण साधा गुन्हाही दाखल झालेला नाही. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट जमिनीत गाडण्याची भाषा झाली, पण साधी दखलसुद्धा घेतली गेली नाही. मात्र हनुमान चालिसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य येताच त्यांना थेट अटक करण्यात आली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 23, 2022
➡️ भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही
➡️ मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही
➡️ महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही
➡️ हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक
देवेंद्र फडणवीस यांनी अजून एका ट्विटमधून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष, इतकी दंडुकेशाही ? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार, एवढीच तुमची मदुर्मकी? अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण, जनता सारे काही पाहते आहे! जे होतंय ते निव्वळ लज्जास्पद आहे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? का असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच लोकशाहीचे गार्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का? अशी विचारणाही त्यांनी केली.