Join us

...म्हणून मुंबई पुरासाठी बनली अतिसंवेदनशील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:06 AM

संशाेधकांचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या चार ते पाच दशकांतील अशाश्वत शहरीकरण, नियोजनशून्य विकास, मोठ्या प्रमाणात जमिनीच्या ...

संशाेधकांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या चार ते पाच दशकांतील अशाश्वत शहरीकरण, नियोजनशून्य विकास, मोठ्या प्रमाणात जमिनीच्या वापरांची उद्दिष्टे बदलणे, खारफुटीच्या जंगलांचा नाश, पाण्याच्या मार्गात भर घालून बांधकाम करणे, अपुरी सांडपाणी वाहतूक व्यवस्था आणि पुरापासून बचाव करणाऱ्या नैसर्गिक रक्षकांचा अभाव या कारणांमुळे हा भाग पुरासाठी अतिसंवेदनशील बनला आहे, अशी माहिती एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधक असलेले संशोधनाचे प्रमुख लेखक मलय कुमार प्रामाणिक यांनी दिली.

पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंटचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल म्हणाले, मिठी नदीला रस्ते व इतर अतिक्रमणांमुळे नाल्याचे स्वरुप आले. आपली शहरे जोराचा पाऊस, वादळ आणि समुद्राची भरती यांचा एकत्रित परिणाम हाताळण्यासाठी विकसित नाहीत. आपल्याला स्थानिक पातळीवर भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्या यावर आधारित धोरण आणि कृती कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे. कृती कार्यक्रमांत भरतीच्या वेळापत्रकासह पुराची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेचा समावेश असावा. योजना बनवताना कृत्रिम व नैसर्गिक सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे. खारफुटीची जंगले पुरापासून बचाव करणारी कमी खर्चाची यंत्रणा आहे. त्यांच्यामुळे पुराच्या प्रवाहाचा वेग कमी होतो. बायो ड्रेनेजचाही वापर केला पाहिजे. पुराच्या वेळी पाणी वाहून नेणाऱ्या व इतर वेळी पावसाचे पाणी साठवणाऱ्या कालव्यांचे जाळे निर्माण करायला हवे.

भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसीच्या संशोधन संचालक आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. अंजल प्रकाश म्हणाल्या, महासागरांच्या पृष्ठभागाचे वाढते तापमान हे उष्ण कटिबंधीय वादळांची संख्या, तीव्रता, पावसाचे प्रमाण वाढवणार आहे. लाटांची उंची आणि समुद्राची पातळी वाढणार आहे. मुंबई सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक आहे. सांडपाणी वाहून नेणारी अपुरी व्यवस्था, विकासकामे आणि पाणीसाठे नष्ट होणे, सांडपाणी यंत्रणेवरील अतिक्रमणे आणि किनारपट्टीवरील खारफुटीची जंगले, असे विविध विषय प्राधान्यक्रमाने हाताळले गरजचे आहे.

.........................................................