Join us

...म्हणून मुंबई अंधारात गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 4:43 PM

Power Of Mumbai : अचानक १ हजार मेगावॅटचा भार

मुंबई : मुंबईची आयलँडिंग सिस्टीम ही शहराला मोठया प्रमाणावर वीज पुरवठा खंडीत होण्यापासून वाचविते. सोमवारी झालेल्या खंडीत वीज पुरवठयादरम्यान सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी ही सिस्टीम यशस्वीरित्या वेगळी करण्यात आली. मात्र अचानक १ हजार मेगावॅटचा भार ही सिस्टीम सहन करू शकली नाही परिणामी १० वाजून ५ मिनिटांनी बंद पडलेल्या यंत्रणेमुळे मुंबईत अंधारात गेली.

आता महापारेषणकडून वीज पुरवठयासाठीच्या यंत्रणा पुर्ववत करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र सोमवारी झालेल्या वीज पुरवठा खंडीत प्रकरणानंतर आता ही जबाबदारी नेमकी कोणाची याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असतानाच टाटा पॉवरकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर तातडीने वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले. ट्रान्समिशन लाईन कनेक्ट होताच तीन हायड्रो युनिटमधून वीज आणण्यात आली. शिवाय ट्रॉम्बे गॅस आणि कोल युनिट कार्यान्वित झाली. मात्र एवढे होऊनही सोमवारी रात्रीपर्यंत मुंबईत बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

महापारेषणच्या कळवा-पडघा केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, कल्याण, पालघर, नवी मुंबईचा खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत होण्यास दुपारचे दोनएक वाजले; तर काही ठिकाणी तब्बल सायंकाळचे पाच वाजले. विशेषत: मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी दुपारी बारा वाजल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होत असला तरी दुपारी पुन्हा दोन वाजण्याच्या सुमारास खंडीत झालेल्या वीज पुरवठयाने मुंबईकरांना नकोसे केले. ऊर्जा विभागाच्या म्हणण्यानुसार, कॅसकॅडिंग इफेक्टमुळे मुंबई शहरासह उपनगराचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. 

टॅग्स :भारनियमनवीजमुंबईमहाराष्ट्र