...म्हणून मुंबईकर करताहेत बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:34+5:302021-06-03T04:06:34+5:30

तिसऱ्या लाटेची धास्ती; पावसाळा जवळ आल्याने जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यापासून ...

... so Mumbaikars crowd the market | ...म्हणून मुंबईकर करताहेत बाजारात गर्दी

...म्हणून मुंबईकर करताहेत बाजारात गर्दी

Next

तिसऱ्या लाटेची धास्ती; पावसाळा जवळ आल्याने जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यापासून मुंबईतील बाजारपेठा आणि रस्त्यांवरील गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा आणि पावसाळा जवळ आल्याने जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव करण्यासाठी ही गर्दी होत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्व प्रमुख बाजारपेठा तुडुंब भरत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा कोरोना वाढण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे; पण इतका धोका पत्करून मुंबईकर का बरे घराबाहेर पडत असतील, याचा मागोवा घेतला असता काही ग्राहकांनी सरकारलाही विचारात पाडणारी उत्तरे दिली.

मालाड येथील शैलजा मोरजकर यांनी सांगितले की, पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे पुढील चार महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्यासाठी बाजारात चकरा माराव्या लागत आहेत. दुकाने पूर्ण क्षमतेने उघडी नसल्याने पुन्हा पुन्हा यावे लागत आहे. पावसाळ्यात रांगा लावून खरेदी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधीच जमवाजमव करून ठेवत आहे.

जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने जवळपास दीड महिना बंद होती. १ जूनपासून ती मर्यादित वेळेत खुली करण्यास परवानगी दिल्याने ग्राहक तिकडे धाव घेत आहेत. चांदीवलीतील कपड्याच्या दुकानात आलेल्या एका ग्राहकाने सांगितले, पावसात कपडे वाळत नाहीत. लहान मुले घरी असल्याने या काळात मोठी समस्या जाणवते. अशावेळी अतिरिक्त कपडे घरात असावे लागतात. कालपासून कपड्याची दुकाने सुरू झाल्याचे कळताच बाजारात धाव घेतली.

पावसाळ्यात तिसरी लाट आली तर खायचे काय, याची चिंता ग्राहकांना आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, पीठ, मीठ, मसाले, डाळी, कडधान्यांसह आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे.

* पुन्हा निर्बंध कठोर केले तर?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चर्चा कानावर आल्यामुळे अनेक जण बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. दुसरी लाट अनपेक्षितपणे आली. लॉकडाऊन लागला. ज्यांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवला नव्हता त्यांना रांगेत तासन्‌तास उभे राहून खरेदी करावी लागली. पुन्हा कोरोना वाढल्यास निर्बंध कठोर केले जातील. मात्र, पावसाळ्यात अशी रांग लावून खरेदी करणे शक्य नसल्याने बरेच जण पावसाआधी बाजारात धाव घेत असल्याचे घाटकोपरमधील व्यापारी उन्मेष मेहता यांनी सांगितले.

आदल्या दिवशी कळते, उद्यापासून सगळे बंद!

निर्बंध लागू करायच्या आदल्या दिवशी नागरिकांना सूचित केले जाते. मग लोकांची खरेदीसाठी धावपळ उडते. काही वस्तू मिळतात, काही मिळत नाहीत. सरकारच्या या निर्बंधांना जनता कंटाळली असून, पावसात अशा अघोरी निर्णयांचा फटका बसू नये यासाठी आधीच आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवत आहोत.

- रश्मी गवस, चांदीवली

* दुकाने पूर्णवेळ खुली ठेवा

पावसाळापूर्व खरेदी दरवर्षी करावी लागते. निर्बंध शिथिल झाल्यामुळे खरेदीसाठी बाजारात गर्दी होणे स्वाभाविक आहे. कारण प्रत्येकाला चार महिन्यांचा बाजार भरून ठेवायचा आहे. गर्दीवर अंकुश आणायचा असेल तर दुकाने पूर्णवेळ खुली ठेवावीत.

- गुणवंत दांगट, कुर्ला

-----------------------------------------------------------------------------------------------

Web Title: ... so Mumbaikars crowd the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.