... म्हणून माझी मुले शिकतात मराठी शाळेत, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 02:32 PM2022-09-19T14:32:25+5:302022-09-19T14:33:03+5:30

अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची माहिती

... So my children study in Marathi school, actress Chinmayi Sumit clearly stated | ... म्हणून माझी मुले शिकतात मराठी शाळेत, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी स्पष्टच सांगितलं

... म्हणून माझी मुले शिकतात मराठी शाळेत, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घातले आणि मराठीशाळा सहज आनंददायी शिक्षण देतात, याची खात्री झाल्यावरच मी मराठी शाळांची सदिच्छादूत झाले. एकूणच अनुभव घेतल्यानंतरच मी मराठी शाळांची जाहिरात करत आहे, असे अभिनेत्री चिन्मयी सुमित  म्हणाल्या. 
शनिवारी मुंबई मराठी साहित्य संघात मुंबई मराठी साहित्य संघ आणि मराठी अभ्यास केंद्राच्या एकत्रित प्रयत्नांनी आयोजित केलेल्या मराठीप्रेमी पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. मराठी संस्कृती टिकवायची असेल तर मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, असे मत मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी मांडले.

चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापक विजयालक्ष्मी शिंदे आणि चिकित्सक समूह तेलंग बालोद्यानच्या आरती पेवेकर यांनी आपल्या शाळेत होणाऱ्या प्रयोगशील उपक्रमांची माहिती दिली. संवादात्मक इंग्रजी शिकवण्यावर जाणीवपूर्वक भर दिला जातो, असे त्यांनी आवर्जून सांगितले. मराठी माध्यमात शिकल्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला, कारण गोष्टी समजल्या की प्रश्न निर्माण होतात आणि त्यातून आणखी समज वाढते, अशी माहिती मराठी शाळेत शिकलेल्या बालरोग व्यवसायाविषयक समुपदेशक  डॉ. मानसी कदम यांनी दिली. 

मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी शाळा यांच्यात आंतरिक नाते असल्याचे सांगून दक्षिण मुंबईतील मराठी माणसांचा ठसा दिसायला हवा असेल तर मराठीप्रेमी पालक महासंमेलन येथे होणे का आवश्यक आहे हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्ष अचला जोशी यांनी भूषविले. संस्कारक्षम वयात ज्ञान मिळविण्यासाठी मातृभाषा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी अभ्यास केंद्राच्या प्रतीक्षा रणदिवे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रमुख कार्यवाह डॉ अश्विनी भालेराव यांनी केले. पालक मेळाव्याला चिकित्सक समूहाच्या शिरोळकर हायस्कूल, पोद्दार हायस्कूल, तेलंग बालोद्यान, आर्यन हायस्कूल, कमलाबाईंची शाळा, सेवासदन शाळा तसेच गोरेगावमधील शाळांचे पालक उपस्थित होते. 

फक्त घरात मराठीचा वापर करून भाषा टिकणार नाही, तर मराठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले पाहिजे. त्यासाठी पालकांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी असे मेळावे आयोजित केले पाहिजेत.
    - आनंद भंडारे, कार्यवाह,
    मराठी अभ्यास केंद्र

Web Title: ... So my children study in Marathi school, actress Chinmayi Sumit clearly stated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.