मुंबई - वंचित बहुजन आघाडीच्या 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी लढाई करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात येऊ लागले. त्यावर, आंबेडकरांनी जातीनं खुलासा केला आहे. निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी देण्यात आल्याचं आंबेडकर यांनी म्हटले. ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलेल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची नावे घोषित करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख करून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक डाव खेळला. अॅड. आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष मिळून वंचित बहुजन आघाडी उभी केली आहे. आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यात सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेश आहे.
Lok Sabha Election 2019: आंबेडकरांच्या वंचित आघाडीच्या उमेदवारापुढे समाजाचा उल्लेख
उमेदवारांच्या जातीबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, आज आम्ही जात जाहीर केली. कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली."
'आमचं असं आहे की आम्ही एकदा निवडणूक जिंकलो की पुढे ते फक्त एक राजकीय कार्यकर्ता म्हणूनच काम करतील. आज आम्ही त्यांना फक्त कार्यकर्ता म्हणूनच तिकिट दिलं आहे. ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात आहे', असे आंबेडकर यांनी सांगितले. तर ब्राह्मण किंवा सवर्ण जातींना का तिकिट दिलं नाही, याबाबत उत्तर देताना ते म्हणाले की, "जैन आणि मारवाडी समाज हा भाजपबरोबर आहे. त्यामुळे आम्ही त्यांना गृहीत धरलं नाही. जर त्यांना वाटत असेल आमच्याकडे यावं तर खुल्या मनाने त्यांनी आमच्याकडे यावं. तसेच 'ब्राह्मण आणि कोमटी समाजातून कुणी आमच्याकडे उमेदवारी मागितली नाही. आम्हाला या समाजातून माणसंच मिळाली नाहीत', असे आंबेडकर म्हणाले.