...म्हणून नणंदेच्या नवऱ्याने तिची हत्या करून स्वतःचेही संपविले आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:05 AM2021-04-12T04:05:48+5:302021-04-12T04:05:48+5:30
चेंबूरमधील घटना; नातेवाईकांसमोरच रंगला थरार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकतर्फी प्रेमातून नणंदेच्या नवऱ्यानेच तरुणीची हत्या करून स्वतः आत्महत्या ...
चेंबूरमधील घटना; नातेवाईकांसमोरच रंगला थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकतर्फी प्रेमातून नणंदेच्या नवऱ्यानेच तरुणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूर, वाशीनाका परिसरातील म्हाडा वसाहतीत २५ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसोबत राहत होती. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नणंदेचा नवरा मोहम्मद शेख तेथे आला. तरुणी त्याच्याविरुद्ध पाेलिसांत तक्रार करणार असल्याचे त्याला समजले होते. तिच्याशी काहीतरी बाेलायचे आहे असे सांगून मोहम्मदने नातेवाईकांना जबरदस्तीने घराबाहेर काढले. त्यानंतर आतून कडी लावून तरुणीला बेदम मारहाण केली. काचेच्या खिडकीवर तिचे डोके आपटले. फुटलेल्या काचेने तिच्या गळ्यावर वार केले. एकीकडे तरुणी मदतीसाठी आवाज देत होती, तर दुसरीकडे तिच्या किंकाळीने नातेवाईक तिला सोडण्यासाठी विनवणी करत होते. मात्र मोहम्मद तिच्यावर क्रूरपणे वार करत हाेता.
ती मेल्याची खात्री पटताच त्याच काचेने त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. नातेवाईक दरवाजा तोडून आत येण्याआधीच दोघांचा मृत्यू झाला होता. घटनेची वर्दी लागताच आरसीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. मुंब्रा येथे राहणाऱ्या तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहम्मदविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला.
आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून मोहम्मदने तरुणीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
दरम्यान, मोहम्मदच्या विचित्र वागण्याला कंटाळून संबंधित तरुणी पोलिसांत तक्रार करणार होती; मात्र त्यापूर्वीच तिची हत्या झाल्याचीही माहिती समोर येत आहे. पोलीस त्यांच्या नातेवाईकांकडे अधिक तपास करत आहेत.