... म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही, संजय राऊतांनी मांडलं नेमकं गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 10:18 AM2021-03-28T10:18:13+5:302021-03-28T10:21:04+5:30
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व काळात नेमके काय केले? राज्यपाल हे आजही ठाकरे सरकार जावे यासाठी राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात घालून बसले आहेत.
मुंबई - संजय वाझे प्रकरणावरुन आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर देशात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची प्रतिमा मलीन झाली असून सरकारच्या विश्वासर्हतेवरच प्रश्न निर्माण झाले. या प्रकरणावरु लोकसभेतही गदारोळ पाहायला मिळाला, भाजपा नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली. याप्रकरणावरुन आता शिवसेना नेते आणि खासदार संजय यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर रोखठोकच्या माध्यमातून बाण चालवले आहेत. तर, महाविकास आघाडीच्या डॅमेज कंट्रोलवरही भाष्य केलं असून राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्न विचारले आहेत.
परमबीर सिंग प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या चारित्र्यावरच प्रश्न निर्माण झाल्याचं राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून म्हटलंय. सरकारकडे डॅमेज कंट्रोलची योजना नसल्याचं सांगत, परमवीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणावरुन सरकारच्या डॅमेज कंट्रोलचा फज्जा उडाल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व काळात नेमके काय केले? राज्यपाल हे आजही ठाकरे सरकार जावे यासाठी राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात घालून बसले आहेत. अँटिलिया व परमबीर सिंग लेटर प्रकरणात तरी हे सरकार जाईलच या आशेवर ते होते. त्यावरही पाणी पडले. पुन्हा महाराष्ट्रातील भाजप नेते ऊठसूट राज्यपालांना भेटतात. सरकार बरखास्तीची मागणी करतात. त्यामुळे राजभवनाची प्रतिष्ठाही काळवंडली. सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवून सहा महिने झाले, पण राज्यपाल कोश्यारी हे ठाकरे सरकार जायची वाट पाहत आहेत. हा घटनात्मक भंग आहे, असं गणित राऊत यांनी मांडलय. राऊत यांच्याकडून सातत्याने 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना प्रश्न विचारण्यात येतो. विशेष म्हणजे जोपर्यंत 12 आमदारांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत मी राज्यपालांवर टीका करणारच, असेही राऊत यांनी यापूर्वीच म्हटलंय.
अनिल देशमुख, वाझे, परमबीर यांचे पत्र या सर्व घोळात सरकारचा पाय नक्कीच अडकला. तो पुनःपुन्हा अडकू नये. अधिकाऱ्यांनी सरकारला अडचणीत आणले, वाझे हा साधा फौजदार, रश्मी शुक्ला या ज्येष्ठ आयपीएस. परमबीर हे त्यापेक्षा ज्येष्ठ. अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे. आपल्याच मर्जीतले अधिकारी नेमण्याचा पायंडा नव्याने पडला. हे मर्जीतले अधिकारीच गोत्यास काळ ठरले!, असेही ते म्हणाले. तसेच, सरकारने काय करावे हे सांगण्यासाठी हा प्रपंच नाही. सरकार निसरडय़ा टोकावरून घसरत आहे व नशिबाने वाचत आहे. या सर्व खेळात महाराष्ट्राला नक्की काय मिळाले? असा प्रश्नही राऊत यांनी विचारला आहे.