"... म्हणून मी लोकसभेच्या मैदानात"; लंकेंनी सांगितलं दहशतीचं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 08:47 PM2024-03-29T20:47:38+5:302024-03-29T20:49:24+5:30
मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो.
मुंबई/अहमदनगर - पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांना आपण आजच राजीनामा पाठवत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबईत हा राजीनामा अध्यक्षांना आजच पोहोच होईल. तसेच मेलवरही पाठवत आहोत, असेही त्यांनी सांगितले. निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकीसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून निलेश लंकेची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळाच सुरू झाली आहे. दरम्यान, यावेळी निलेश लंकेंनी विखे पाटलांच्या दहशतीचं राजकारण संपवायचं असल्याचंही म्हटलं.
मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, पण आपल्याला लोकसभेला सामोरे जायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणर आहे. चार महिने शिल्लक असताना काही कटू निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहेत. आपण आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा आहे. मला माहिती आहे, तुमच्या मनात माझ्याबद्दल चीड निर्माण होईल. तुम्हाला जेवढी चीड निर्माण होणार आहे, त्याच्या १० पट जास्त वेदना माझ्या शरीराला होत आहेत, असे म्हणत निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची घोषणा, कार्यकर्त्यांसमोर केली. तसेच, आपण तालुक्यासाठी काम केलं, पण आता दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे, आपण लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही लंकेनी यावेळी केली.
दहशतीला पायबंद घालण्यासाठी मैदानात
लंके यांनी शुक्रवारी सायंकाळी सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधताना त्यांनी विखे पाटील यांच्यावर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टीका केली. विखे यांनी आपल्यावरील रागापोटी पारनेरची सर्व कामे अडवली. त्यांनी मतदारसंघात दहशत निर्माण केली आहे. या दहशतीला पायबंद घालण्यासाठी आपण मैदानात उतरलो आहोत. शेपूट घालून बसणारी औलाद आमची नाही. माझ्यावर वारंवार वार करण्याचा प्रयत्न केला. कोणी काही म्हणू पण यंदाची निवडणूक 'कम से कम दो लाख' असं म्हणत २ लाख मतांनी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास निलेश लंकेंनी व्यक्त केला.