मिलिंद बेल्हे, सहयाेगी संपादक
केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईतील वाहतूक प्रकल्पाच्या वाट्याला जो निधी आला आहे, त्यातील १९ हजार २९३ कोटी खर्चून २३८ एसी लोकल खरेदी केल्या जाणार आहेत. एमयूटीपी ३ अंतर्गत ४७ एसी गाड्यांसाठी ३,४९१ कोटी आणि एमयूटीपी-३ ए अंतर्गत १९१ एसी गाड्यांसाठी १५,८०२ कोटी खर्च केले जाणार आहेत. याचा अर्थ नजीकच्या काळात किंवा या एसी गाड्यांची खरेदी पूर्ण होईपर्यंत एकही साधी लोकल खरेदी केली जाणार नाही.
साध्या लोकलच्या वेळापत्रकात घुसखोरी करून वाढवलेल्या एसी गाड्या प्रवाशांच्या आंदोलनामुळे बंद करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली. त्यानंतर साध्या १२ किंवा १५ डब्याच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढतील, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. गाड्या उपलब्ध नसल्याने फेऱ्या वाढवल्या जाणार नाहीत, असे सांगत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सध्या तरी १५ डब्यांच्या फेऱ्या वाढविणे शक्य नाही. त्यामुळे १२ डब्यांच्या काही फेऱ्या रद्द कराव्या लागतील, असे सांगून टाकले. मुळात १२ डब्याच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून त्याची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढविणे हा हेतू होता. त्यानुसार पश्चिम रेल्वेने जानेवारीत १५ डब्यांच्या १२ फेऱ्या वाढविल्या. फक्त मध्य रेल्वेलाच ते का शक्य नाही, ते समजू शकलेले नाही.
अन्य नवे मार्ग सुरू होऊच शकणार नाहीत ! मध्य रेल्वेवर दिवा-पनवेल, डहाणू-पनवेल, कर्जत-पनवेल, पनवेल-उरण या मार्गावर लोकल सुरू करण्याची मागणी जुनीच आहे. यातील डहाणू-पनवेल मार्गाला उपनगरी मार्गाचा दर्जाही दिला गेला, पण तेथे लोकल सुरू झालेली नाही. फक्त मेमू गाड्या धावतात.
कल्याण ते कर्जत-कसारा मार्गावर फेऱ्या वाढवण्याचा प्रस्तावही २३ वर्षे फक्त चर्चेत आहे. हार्बर मार्ग, ठाणे-पनवेल, नेरूळ-उरण ट्रान्सहार्बर मार्गावरही लोकल वाढविणे कठीण होईल. पनवेल-पेण, रोहा, अलिबाग हे मार्गही प्रत्यक्षात येणे कठीण होईल. जर साध्या लोकलची खरेदीच केली गेली नाही, तर या मार्गांवर लोकल फेऱ्या सुरू करणे-वाढविणे शक्य नाही.
मेट्रोशी तुलना कशी?मेट्रोच्या गाड्या एसी असतात. तेथे जास्त तिकीट मोजून प्रवासी जातात ना? मग ते एसी लोकलमध्येही येतील, असा युक्तिवाद रेल्वेकडून केला जातो. जर साध्या गाड्या उपलब्ध नसतील, तर प्रवासी आपसूक एसीकडे वळतील, असाही तर्क मांडला जातो. पण लोकलचे सर्वच प्रवासी सरसकट मेट्रोने प्रवास करत नाहीत. त्यांना शेअर रिक्षा, शेअर टॅक्सी, स्वस्तातील बेस्ट असे अनेक पर्याय खुले असतात.