वंदे भारत अभियान; परतताना मिळतात मुबलक प्रवासी
सुहास शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ एका प्रवाशाला घेऊन ३६० सीटर विमाने दुबईच्या दिशेने रवाना होत असल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. अशावेळी फेऱ्या रद्द करण्याऐवजी विमान कंपन्या इतका तोटा का बरे सहन करत असतील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर असे की, दुबईला गेलेली ही विमाने परतताना वंदे भारत अभियानांतर्गत प्रवासी घेऊन येत असल्याने त्यातून तूट भरून निघत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१९ मे रोजी ३६० सीटर, तर २२ मे रोजी २५६ सीटर विमानाने एकमेव प्रवाशासह दुबईसाठी उड्डाण केले. मुंबई ते दुबई प्रवास अडीच ते तीन तासांचा असून, त्यासाठी जवळपास १७ टन इंधन खर्च होते. सध्याच्या दरानुसार त्याचे बाजारमूल्य ८ लाख रुपये इतके आहे. एकीकडे कोरोनामुळे हवाई वाहतूक क्षेत्र सर्वाधिक तोट्यात असताना एका प्रवाशासाठी इतका खर्च विमान कंपनीला परवडतो कसा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने ‘लोकमत’ने त्याचा मागोवा घेतला.
मुंबईतून विमाने रिकामी जात असली, तरी दुबईहून परतताना सीट फुल्ल असतात. वंदे भारत अभियानांतर्गत या विशेष फेऱ्यांचे नियोजन केले जाते. त्याचे भाडेही इतर फेऱ्यांच्या तुलनेत अधिक असते. भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध वाढविल्याने प्रवाशांकडे ‘वंदे भारत’शिवाय अन्य पर्याय नसल्याने चढ्या दरात तिकीट विकत घ्यावे लागते. त्यामुळे आपोआपच रिकाम्या फेरीचा खर्चही यातून वसूल होतो, असे सूत्रांनी सांगितले.
संयुक्त अरब अमिरतीने (यूएई) भारतीय प्रवाशांच्या आगमनावर बंदी घातली असली, तरी तेथून भारतात येणाऱ्यांवर निर्बंध नाहीत. शिवाय एअर इंडिया आणि अमिरात एअरलाईन या दोनच विमान कंपन्या पूर्ण क्षमतेने सेवा देत असल्याने दुबईत त्यांना मुबलक प्रवासी मिळत आहेत. दुबईहून येणारी विमाने दिल्ली किंवा मुंबई या मोठ्या विमानतळांवर उतरण्याआधी कोची, मंगळुरू, तिरुवनंतपुरम, अहमदाबाद या मार्गे प्रवाशांना सोडून येत असल्याने फेऱ्यांना प्रतिसाद वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुबईतून मुंबईत आलेले प्रवासी
तारीख..... प्रवासी.... फेरी
२६ मे.... २३० ..... (दुबई - तिरुवनंतपुरम-मुंबई)
२५ मे .... २३८ ..... (दुबई-कोची-मुंबई)
२२ मे.... २३३ .....(दुबई-मुंबई)
१९ मे.... २४५... (दुबई - तिरुवनंतपुरम-मुंबई)
...........................................