...म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे 'मातोश्री' निवासस्थान परिसर पूरमुक्त राहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:33 AM2020-10-11T00:33:36+5:302020-10-11T06:56:54+5:30
BMC, CM Uddhav Thackeray News: हमखास तुंबणाऱ्या ठिकाणी मिनी पंपिंग; कलानगरमध्ये यशस्वी। राबविणार मुंबईभर
मुंबई : यंदा मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसाने अनेक वेळा मुंबईची तुंबापुरी केली. कधी न तुंबणाऱ्या दक्षिण मुंबईची यावेळेस दैना उडाली. त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान असलेला कलानगर परिसर पूरमुक्त राहिला. येथे उभारण्यात आलेल्या मिनी पंपिंग स्टेशनने ही किमया साधली आहे. त्यामुळे हाच प्रयोग मुंबईतील काही हमखास तुंबणाऱ्या स्थळी करण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे.
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील पर्जन्य वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता ताशी ५० मि.मी. करण्यात आली. तसेच हाजी अली, इर्ला, लव्हग्रोव, क्लिव्ह लँड, गजदर बंद, ब्रिटानिया अशी सहा पंपिंग स्टेशन्स बांधण्यात आली. तर मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशन्स बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र हिंदमाता, सायन रोड क्रमांक २४ अशी काही ठिकाणे आजही पूरमुक्त झालेली नाहीत.
यावर्षीच्या पावसाळ्यात पाण्याखाली गेलेल्या अशा काही ठिकाणांचा महापालिका अभ्यास करीत आहे. टोकियो शहराच्या धर्तीवर पूरबोगदा बांधून त्यात पावसाचे पाणी साठवण्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. मात्र यासाठी किमान तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत तत्काळ दिलासा देण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशन तसेच फ्लड गेटद्वारे पुराचे पाणी रोखण्याबाबत विचार सुरू आहे.
असे झाले कलानगर पूरमुक्त
वांद्रे पूर्व येथील ४२ छोट्या आणि मोठ्या नाल्यातून पावसाचे पाणी अरबी समुद्रात जाते. मात्र कलानगर आणि खेरवाडी हे परिसर बशीप्रमाणे असल्याने भरतीच्या वेळी या ठिकाणी पाणी तुंबून राहते. जानेवारी महिन्यात येथे मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. दर मिनिटाला ४९,८०० लीटर पावसाचे पाणी उपसण्याची क्षमता येथील पंपांमध्ये आहे. तसेच सहा फ्लड गेटद्वारे पावसाचे पाणी समुद्रात फेकले जाते. यासाठी महापालिकेने ११ कोटी रुपये खर्च केले आहेत.
‘मिनी’चा प्रयोग
असाच प्रयोग हिंदमाता, गांधी मार्केट आणि परळ अशा काही ठिकाणी केला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.