...तर विधानसभेत कोथळे बाहेर काढायला राज ठाकरे आहेच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 08:12 AM2024-04-10T08:12:46+5:302024-04-10T08:13:16+5:30
फक्त मोदींसाठी महायुतीला ‘मनसे’ पाठिंबा; लोकसभा नाही, विधानसभा मात्र लढणार
भारत हा जगातला सर्वांत तरुण देश आहे; पण इथे बेरोजगारी आहे. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आधुनिक शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांना व्यवसाय करता आले पाहिजेत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काम करावे, अशी माझी पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहे. त्यांनी तरुणांकडे लक्ष द्यावे, महाराष्ट्र जेवढा कर भरतो त्यातील योग्य वाटा महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपण महायुतीला पाठिंबा
देत आहोत, असे ते म्हणाले. या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर विधानसभेत कोथळे बाहेर काढायला राज ठाकरे आहेच, असा इशाराही राज यांनी दिला.
मुंबई : देशाच्या भवितव्यासाठी आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि माझी नरेंद्र मोदींकडून त्याबाबत खूप अपेक्षा आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप- शिवसेना- राष्ट्रवादीच्या महायुतीला मी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात केली. मनसे लोकसभेची निवडणूक लढणार नाही, असे जाहीर करतानाच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागा, असे आदेश मनसैनिकांना दिले.
ते म्हणाले की, मी अमित शाह यांना दिल्लीत भेटलो, नंतर माझी शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. चर्चेत जागावाटप वगैरे विषय आला; पण मी त्यांना सांगून टाकले की, ही जागा पाहिजे ती पाहिजे याची चर्चा करण्याची माझी प्रवृत्ती नाही.
भाजपच्या चिन्हावर लढावे असा प्रस्ताव होता...
nमनसेच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर लढावे असा प्रस्ताव आला होता, असे सांगून राज म्हणाले की, इंजिन हे मनसेचे चिन्ह आम्ही आमच्या कष्टाने कमावलेले आहे, ते सोडणार नाही.
nशाह यांना भेटल्यानंतर मी शिवसेनेचा प्रमुख होणार यापासून अनेक बातम्या आल्या. माझे मनोरंजन झाले. शिवसेनेचे अध्यक्ष व्हायचेच होते तर मी तेव्हाच झालो असतो; पण एखादा पक्ष फोडून मला अध्यक्ष वगैरे व्हायचे नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
तेव्हा माझ्यासोबत का नाही आले?
nमी अमित शाह यांना भेटल्याबरोबर, मग त्या ‘लाव रे तो व्हिडिओ’चे काय होणार? असे सवाल सुरू झाले. २०१९ च्या निवडणुकीत मी नरेंद्र मोदींवर टीका केली होती; पण सत्ता गेली म्हणून उद्धव ठाकरे, संजय राऊत करतात तशी ती टीका नव्हती. ती टीका स्वार्थासाठी आहे.
nउद्धव, राऊत सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी भाजपसोबत होते, तेव्हा राजीनामे खिश्यात घेऊन फिरत होते. ते फेकून माझ्यासोबत का नाही आले, असा सवाल राज यांनी केला. मी महाराष्ट्रावर प्रेम करतो, त्याचे हित होताना दिसत नव्हते म्हणून मी टीका केली; पण कलम ३७० मोदींनी हटविले तेव्हा अभिनंदन करणारा मी पहिला होतो.