मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचले असून आज त्यांची गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासमवेत बैठक आहे. दिल्लीतील आजच्या बैठकीतनंतर राज ठाकरे यांची महायुतीतील सहभागाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत १ ते २ जागा दिल्या जाणार असल्याचे समजते. त्यापैकी, द.मुंबईतील जागेवर मनसेकडून राज ठाकरेंचे शिलेदार बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज ठाकरे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता पुत्र अमित ठाकरे तसेच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर, आजा अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरेंची बैठक होणार असून ठाकरे-शाह बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत. कोणाला भेटत आहे, का भेटत आहे, या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील. एवढे नक्की आणि आत्मविश्वासाने सांगेन की, राज ठाकरे जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. हिंदुत्वाच्या हिताचा असेल. मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. यावेळी, बाळा नांदगावकर यांच्या उमेदवारवरही त्यांनी भाष्य केले.
बाळा नांदगावकर यांना मनसेकडून दिल्लीत पाठवले जाणार आहे का, या प्रश्नावर देशपांडे यांनी सूचक विधान केले आहे. बाळा नांदगावकर आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत ते अनेक वर्ष आहेत. बाळा नांदगावकर दिल्लीत गेले, खासदार झाले तर आम्हा महाराष्ट्र सैनिकांना आनंदच होईल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता मुंबईत शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण, बाळा नांदगावकर यांना मनसेकडून दक्षिण मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे, महायुतीत मनसेचा समावेश झाल्यास मनसेकडून राज ठाकरेंचा शिलेदार ठाकरेंच्या उमेदवाराविरुद्धच दंड थोपटणार असल्याचे चित्र आहे. कारण, द. मुंबईत मतदारसंघातून शिवसेना उबाठाकडून खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी मतदारसंघात सभाही घेतली.
दरम्यान, चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीत आलेल्या राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे, महाराष्ट्राचे लक्ष आज दिल्लीकडे लागले असून महाविकास आघाडीतील नेत्यानी राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली आहे. तर, काहींनी राज ठाकरेंना महाविकास आघाडीत येण्याचे निमंत्रणही दिले आहे.